देशात करोनाची दुसरी लाट आक्राळविक्राळ होत आहे. दररोज रुग्णसंख्येचे नवे विक्रम नोंदवले जात असून, मृतांची संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत उत्तराखंडमधील हरिद्वार येथे महाकुंभमेळा होत असून, कुंभमेळ्या दरम्यान भाविकांची मोठी गर्दी लोटत आहे. कुंभमेळ्यातील गर्दीची आता चर्चा सुरू झाली असून, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या गर्दीवरून गंभीर इशारा दिला आहे.

आणखी वाचा- मृत्यूचं थैमान! नालासोपाऱ्यात ७ करोना रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू

राज्यातील करोना परिस्थितीची आणि लॉकडाउनची माहिती देताना अस्लम शेख यांनी कुंभमेळ्याबद्दल भाष्य केलं आहे.”आज महाराष्ट्रात जास्त रुग्ण आपल्याला दिसत आहेत. पण मी जबाबदारीने सांगतो की, महाराष्ट्रात चाचण्या केल्या जात आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज जी राज्ये करोनासंदर्भात कामं करत नाहीत, कारण त्यांना वाटतंय की, राज्य बदनाम होईल. त्याची काय अवस्था होणार आहे, ते तुम्ही एक आठवडा किंवा १५ दिवसानंतर बघा. कारण अख्ख्या जगात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, असं सांगितलं जात आहे आणि सरकार राजकारण करण्यासाठी कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रम घेतंय. याचा विस्फोट होणार आहे. हे करोना रुग्ण किती मोठ्या संख्येनं निघणार याची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतलेली आहे. आम्हाला याचा विचार करावा लागेल. जेव्हा हे परप्रांतीय मुंबईत येतील, परिणाम होईल. त्यामुळे त्याचाही विचार नव्या गाईडलाईन्स तयार करताना केला जाईल. कारण देशात भावूक होऊन काहीतरी करायचं सुरू आहे. इतर राज्यात जे नेते आणि मंत्री वैज्ञानिकांचं ऐकायचं नाही, डॉक्टरांचं ऐकायचं नाही आणि स्वतः मनाने जे काही करत आहे, त्याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार आहे,” असं पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

“गेल्या वर्षी लॉकडाउन केला गेला, तेव्हा केंद्र सरकारकडून अचानक आदेश देण्यात आले. त्यावेळी जर लोकांना एका दिवसाचा वेळ दिला असता किंवा गाईडलाईन्स कडक केल्या असत्या. तर जे विविध कामासाठी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत. ज्यांनी मालाचा साठा केलाय. या सगळ्यांना त्याचं काम पूर्ण करण्यासाठी संधी दिली असती, तर करोनामुळे लोकांना जेवढा त्रास झालाय, त्याच्या तीनपट जास्त त्रास लोकांना व्यवसायात झाला आहे. ही स्थिती केंद्रामुळे झाली आहे. त्यावेळी केंद्राला का सूचलं नाही, मला माहिती नाही. पण, राज्यात असं होता कामा नये म्हणून सरकार सर्व असोसिएशनबरोबर चर्चा करतंय. सगळ्यांच्या सूचना ऐकल्या. परप्रांतियांचं म्हणत असाल, तर त्याची दोन कारणं आहेत. पावसाळा सुरूवात झाल्यानंतर शेती करायला जातात. त्यांना त्रास होऊन नये म्हणूनच रेल्वे सेवा बंद केलेली नाही. कडक निर्बंध लागू करतानाही सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद केली नाही,” असंही अस्लम शेख म्हणाले.