मालिकांचे सेट, साहित्य यांवर सुरक्षा विभागाची देखरेख

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी दोन महिन्यांपासून बंद असली तरी, या मायानगरीची हालचाल थांबलेली नाही. मालिकांच्या चित्रीकरणाचे भले मोठे सेट आणि त्यांच्याशी निगडित भावविश्व सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा आजही तेथे कार्यरत आहे. चित्रनगरीत राहून अनेक जण स्पर्धा परीक्षांची तयारीही करत आहेत. मिळालेल्या वेळात चित्रीकरणावेळचे किस्से, आठवणींना रंग चढत आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या समन्वयाचे काम ‘महाराष्ट्र राज्य, चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळा’तर्फे चालते. दररोज चाळीस ते पन्नास मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणाची क्षमता येथे आहे. ‘लाइट्स- कॅमेरा- अ‍ॅक्शन’ या मंत्रावर गजबजणारा इथला व्यापार टाळेबंदी सुरू झाल्यापासून दोन महिने पूर्ण बंद आहे. ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘डान्स सुपरस्टार’, ‘केबीसी’, ‘नागिन २’ या मालिका, महेश कोठारे तसेच एकता कपूरच्या बालाजी, यासह वीस छोटय़ा-मोठय़ा निर्मिती संस्था आणि मालिकांचे सेट येथे आहेत.

एरव्ही या सेटवर कलाकारांची, तंत्रज्ञांची लगबग असते. वातावरणात उत्साह असतो. सध्या येथील शांतता कर्मचाऱ्यांनाही खायला उठत आहे. मात्र, सर्व काही सुरळीत होईल तेव्हा चित्रनगरीतील व्यवस्था नीट असावी यासाठी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक प्रयत्नशील आहेत. येथील आवश्यक स्वच्छता, सेटची काळजी, ही सगळी जोखीम सुरक्षा रक्षकांबरोबरच स्टुडिओ विभागातील कर्मचाऱ्यांनी पेलली आहे. प्रवासाच्या अडचणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सध्या चित्रनगरीतच मुक्काम ठोकला आहे.  प्रत्येक निर्मिती संस्थेनेही आपापल्या सेटच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमले आहेत.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि चित्रीकरणाच्या आठवणी

चित्रनगरीत काम करणारे अनेक सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी केवळ येथे आपली नोकरीच करत आहेत असे नाही. यातील काही जण उदरनिर्वाहासाठी सुरक्षा रक्षकाचे काम करताना स्पर्धा परीक्षेतील यशाचे स्वप्नही उराशी बाळगून आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत चित्रनगरी बंद असल्याने जोखीम असली तरी तुलनेने कामाचा ताण कमी आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत काम संपल्यावर अनेक जण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. एमपीएससी आणि यूपीएससी, तलाठी, पोलीस भरतीच्या तयारीसाठी उपयोगी पुस्तकांचा संग्रहच कर्मचाऱ्यांनी करून ठेवला आहे. अभ्यास, काम यांच्याबरोबर बघितलेल्या चित्रीकरणाचे किस्से, आठवणी यांची उजळणी करणारे गप्पांचे फड रंगत आहेत.

माणसांची वर्दळ कमी झाल्याने येथील सेट्सवर अपघात, चोरी होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे चोवीस तास येथील सुरक्षा रक्षकांकडून सेट्स व्यवस्थित राहतील याची काळजी घेतली जाते. लवकरच चित्रीकरण सुरू होईल, तेव्हा आमची जबाबदारी आणखीनच वाढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेण्यात येईल.

– अशोक जाधव, मुख्य सुरक्षा अधिकारी

अभ्यासाबरोबरच आम्ही वाचन, चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजही पाहतो. चित्रनगरीचा परिसर एवढा मोठा आहे की, कंटाळा आल्यावर एखादी फेरी मारल्यासही मन प्रसन्न होते. मुंबईत असूनही येथील प्राण्यांचा अधिवास आम्हाला जास्त सुखावून जातो. हेलिपॅड अथवा काही चित्रीकरण स्थळांवर रात्री हमखास बिबटय़ा दिसतो.

– सोमनाथ लांगे, सुरक्षा कर्मचारी

व्यवस्था कशी?

संपूर्ण चित्रनगरीवर लक्ष ठेवण्यासाठी १०८ कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या सुरक्षा विभागात १०६ कर्मचारी कार्यरत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मेकअपरूममध्ये करण्यात आली आहे. फिल्मसिटीत माकडे, बिबटय़ा, हरीण यांचाही रात्री वावर असल्याने ही मोठी जबाबदारी आहे.