राज्यात काही दिवसांपासून करोनाच्या संसर्गात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाइलाजाने कडक टाळेबंदी लागू करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची लस घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. करोनाची लस घेण्यात कोणतीही भीती नाही. करोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लशीचे काही दुष्परिणाम नसून, पात्र असलेल्या प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी के ले. गुरुवारपासून कल्याण-डोंबिवलीत कडक निर्बंध लागू करण्यात आले. जळगावात जनता संचारबंदी जाहीर झाली आहे. नागपुरातही टाळेबंदीचा निर्णय जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि संभाव्य टाळेबंदीबाबतही भाष्य के ले.

लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर, वारंवार हात धूत राहणे आणि अंतरनियमांचे पालन महत्त्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही; पण राज्यात करोनाचा धोका वाढतो आहे. अनेक मोठ्या शहरांत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिस्थिती न सुधारल्यास काही ठिकाणी नाइलाजाने कडक टाळेबंदी लागू करावी लागेल. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगून टाळेबंदी टाळावी. पुढील दोन-तीन दिवसांत त्याबाबत निर्णय घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना लस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी जेजे रुग्णालयात जाऊन करोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याच वेळी रश्मी ठाकरे, मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही लस घेतली. या वेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, करोना कृती दलाचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.

देशात चालू वर्षातील उच्चांकी रुग्णवाढ

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २२,८५४ रुग्ण आढळले. करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीचा चालू वर्षातील हा उच्चांक आहे. याआधी २५ डिसेंबरला २३,०६७ रुग्णनोंद झाली होती. त्यानंतर दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख घसरणीला लागला असताना गुरुवारी रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेतली. गेल्या २४ तासांत देशात १२६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

नागपुरात सोमवारपासून आठवडाभर टाळेबंदी

नागपूर : करोना नियंत्रणासाठी नागपूर शहर पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत १५ ते २१ मार्चदरम्यान कडक टाळेबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी केली. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा, सर्व उद्योग सुरू राहतील. मात्र, सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे, ते सोबत ठेवणे आवश्यक राहील. खासगी कार्यालये बंद राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्केच उपस्थिती असेल. ज्या खासगी आणि शासकीय आस्थापनांमध्ये मार्चअखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असलेली कामे सुरू असतील, त्या ठिकाणी गरजेनुसार कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी राहील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

केंद्राची चिंता

  • महाराष्ट्रात करोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली.
  • राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने चाचण्या वाढवण्याची गरज आहे.
  • करोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते.
  • अन्य राज्यांनीही दक्ष रहावे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य  व्ही. के. पॉल यांनी दिला.

राज्यात १४,३१७ नवे रुग्ण

राज्यात गुरुवारी करोनाचे १४,३१७ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ७,१९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, बुधवारी १३ हजारांचा टप्पा पार झाला होता. दैनंदिन रुग्णसंख्येने गुरुवारी १४ हजारांचा टप्पा पार केल्याने चिंतेचे मळभ गडद झाले आहे.