मालमत्तांशी निगडित, महिलांविरोधी गुन्ह्यांत वाढ

मुंबई : टाळेबंदीची पकड अधिकाधिक सैल केल्यावर जनजीवनाप्रमाणे शहरातील गुन्हेगारी पूर्वपदावर येत आहे. टाळेबंदीत काही प्रमाणात कमी झालेली गुन्हेगारी शिथिलीकरणानंतर पुन्हा वाढली आहे. मालमत्तांशी निगडित आणि महिलांविरोधी गुन्ह््यांत वाढ झाली असून पोलिसांसमोर गुन्हेगारी नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबई पोलिसांच्या नोंदींनुसार एप्रिल आणि मे महिन्यांत हत्या, बलात्कार, विनयभंगापासून भुरट्या चोरीपर्यंत सर्व प्रकारचे गुन्हे आटले होते. जून महिन्यापासून मात्र प्रत्येक प्रकारच्या गुन्ह््यांची संख्या वाढू लागली. ऑगस्ट महिन्यांत गुन्हे सरासरीच्या आसपास आले. पुढल्या टप्प्यात टाळेबंदी शिथिल केल्यानंतर गुन्ह््यांची संख्या आणखी वाढेल, असा अनुमान आहे.

पोलिसांकडून गंभीर समजल्या जाणाऱ्या रस्त्यांवरील गुन्हेगारी, चोरीसह जबरी चोरी, घरफोडी हे मालमत्तेशी संबंधित गुन्हे, सायबर गुन्हे आणि महिलांविरोधातील गुन्ह््यांत जून महिन्यापासून वाढ झाली. एप्रिल-मे महिन्यांत शहरातल्या ९४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे नोंद होते. मात्र पुढील तीन महिन्यांत ३३ गुन्हे नोंदवण्यात आले. जबरी चोरीचे गुन्हे दुपटीने वाढले. घरफोड्या ११५ वरून ४५१, चोरी ८५ वरून ६१८, मारहाण ३८६ वरून ७८५, हत्येचे गुन्हे ३० वरून ७८ इतके  वाढले. महिलांविरोधातील गुन्ह््यांचा विचार करता एप्रिल-मे महिन्यांत बलात्काराचे ३० गुन्हे नोंद होते. पुढील तीन महिन्यांत १४८ गुन्ह््यांची नोंद के ली गेली. विनयभंगाचे प्रकार (पोलिसांसमोर आलेले) ९२ वरून ३१९वर पोचले. समाजमाध्यमांवरून आक्षेपार्ह टिप्पणी, अश्लील छायाचित्र तयार करून ती सर्वदूर पसरविण्याची धमकी, हॅक, बनावट खाती तयार करून फसवणूक, कार्ड घोटाळे, ऑनर्लान फसवणुकीच्या गुन्ह््यांत वाढ झाल्याचे पोलीस नोंदींवरून स्पष्ट होते.

गुन्हेगारही टाळेबंदीत

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल-मे या दोन महिन्यांत टाळेबंदी कठोर होतीच पण काळजीपोटी नागरिकांनीही संयम पाळला होता. निकडीलाच घराबाहेर पडण्याचे सोवळे नागरिकांनी तंतोतंत पाळले. शिवाय टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. गर्दीच नसल्याने चोरीचा, किरकोळ कारणांवरून हाणामारीचा प्रश्नच नव्हता. टाळेबंदी शिथिल झाली आणि पोलिसांची पकडही सैल पडली. पुढील तीन महिन्यांत गर्दी वाढली आणि गुन्हेगारीही.