विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई : दहिसरमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने संपूर्ण परिसरात टाळेबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या विचारात पालिका आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात दहिसर भागातील नागरिकांनी टाळेबंदीचे पालन केल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या मर्यादेत होती. मेच्या सुरुवातीला दहिसरमधील रुग्णसंख्या ५० च्या आतच होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढून ३६० वर पोचली आहे. आजवर १२६ जण बरे झाले असले तरी धोका वाढतो आहे. केवळ झोपडपट्टय़ाच नव्हे, तर सोसायटय़ांमधील रहिवाशीही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आता केवळ झोपडपट्टीवासीयच नव्हे तर सोसायटय़ांमधील रहिवाशांनाही करोनाची बाधा होऊ लागली आहे.

पालिकेच्या ‘आर-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत दहिसर आणि आसपासचा परिसर येतो. या हद्दीत ६० टक्के भागात झोपडपट्टय़ा आहेत. दहिसरमधील गणपत पाटील नगर ही या भागातील सर्वात मोठी झोपडपट्टी. दाटीवाटीने उभ्या असलेल्या छोटय़ा झोपडय़ा आणि अरुंद पायवाटा यामुळे झोपडपट्टय़ांमध्ये करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वरळी, भायखळा, धारावीप्रमाणे दहिसरची स्थिती होऊ नये यासाठी ‘आर-उत्तर’ विभागाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये दररोज चार ते पाच वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

झोपडपट्टय़ांमधील अरुंद वाटाही तीन-चार दिवसातून एकदा निर्जंतूक करण्यात येतील. दहिसर भागात जागा नसल्यामुळे कांदिवलीतील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या २१ मजली इमारतीमध्ये ७०० व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या मात्र करोनाची बाधा झालेल्यांसाठी ४०० खाटा असून आजघडीला १७५ जणांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अतिजोखमीच्या गटातील १३ ते १४ जणांना करोनाची बाधा झालीआहे.

याशिवाय नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची फौज पालिके च्या मदतीला दिली आहे. १५ प्रभागांमध्ये मिळून २०० करोना योद्धे कार्यरत आहेत. दर दिवशी २५ ते ३० घरांची तपासणी करत आहेत.

दहिसर आणि आसपासच्या भागात करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आता पोलिसांची मदत घेण्यात येईल. टाळेबंदी काटेकोरपणे पाळली जावी याची काळजी घेतली जाईल. नागरिकांनीही जबाबदारी लक्षात घेऊन विनाकारण फिरणे टाळावे.

-संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त, ‘आर-उत्तर’