शहरबात : प्रकाश लिमये

मीरा-भाईंदर शहरात सातत्याने वाढत असलेली लॉजिंग-बोर्डिग ही शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर शहर हे बार आणि लॉजिंग-बोर्डिगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायासाठी ओळखले जाऊ  नये, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मिंरा-भाईंदर शहरात पर्यटन क्षेत्राला वाव मिळेल असे वातावरण नाही, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठाले उद्योग व्यवसाय देखील नाहीत. त्यामुळे शहराबाहेरून मोठय़ा प्रमाणात लोक येत आहेत आणि त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी लॉज बांधली जात आहेत असे चित्र या ठिकाणी नाही. मात्र तरीदेखील राजरोसपणे नवनवी लॉज उदयाला येत आहेत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मोठय़ा प्रमाणावर लॉज वाढत असताना महापालिकेच्या महसुलात भरघोस वाढ व्हायला हवी होती. मात्र लॉजचालक बेधडकपणे महापालिकेचा परवाना न घेताच व्यवसाय करत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. लॉज चालविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवान्यासोबतच महापालिकेचा व्यवसाय परवाना, अग्निशमन विभागाचा परवाना, गुमास्ता परवाना, अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आदी परवान्यांची आवश्यकता आहे. परंतु ऐंशी टक्के  लॉजनी यातील अनेक परवाने घेतलेच नसल्याचे तसेच ज्यांनी आधी महापालिकेचे व्यवसाय परवाने घेतले आहेत त्यांनी त्याचे नूतनीकरणच केले नसल्याची माहिती प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे. परिणामी महापालिकेचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान केले जात आहेच, शिवाय अनैतिक व्यवसायालादेखील प्रोत्साहन मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत शहरात एकंदर ८६ लॉज असल्याची आकडेवारी समोर आली. यापैकी ४७ लॉज प्रभाग सहा म्हणजेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. पूर्वी हा परिसर डान्स बारसाठी प्रसिद्ध होता. व्यवसायानिमित्त मुंबईत आलेले अनेक जण डान्स बारमध्ये पैसे उधळत असत. त्यामुळे एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असे. डान्स बार बंद होऊन त्याजागी ऑर्केस्ट्रा बार सुरू झाले असले, तरी परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. ऑर्केस्ट्रा बारमधून अश्लील वर्तन सुरू असल्याचे पोलिसांच्या वारंवार होत असलेल्या कारवाईत उघड होत आहे. मुख्य म्हणजे हे वादग्रस्त ऑर्केस्ट्रा बार आसपासच्या परिसरात असलेल्या लॉजशी संलग्न आहेत अथवा बारमध्येच लॉज उभारण्यात आली आहेत. ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणारे कर्मचारीच मध्यस्थाची भूमिका बजावतात आणि मग वेश्या व्यवसायासाठी लॉजचा वापर केला जातो.

या अनैतिक व्यवसायासाठी लॉजच्या मूळ बांधकाम रचनेत अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. इमारतीच्या मूळ आराखडय़ात फेरबदल करून लॉजमध्ये अनधिकृतपणे दालने तयार करून त्याचा अनैतिक व्यवसायासाठी वापर केला जातो. अनेक लॉजमध्ये तर पोलीस कारवाई झाली तर मुलींना लपविण्यासाठी छुपी दालने तसेच त्यांना लॉजबाहेर काढण्यासाठी छुपे मार्ग तयार करण्यात आले आहेत.

लॉजमध्ये चालणाऱ्या अनैतिक व्यवसायाला आळा बसावा यासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी लॉजमध्ये करण्यात आलेल्या अंतर्गत फेरबदलावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेकडून शहरातील लॉजचे सर्वेक्षण देखील करण्यात आले.

दुसरीकडे लॉजमध्ये सर्रास अनैतिक व्यवसाय चालत असल्याने लॉजना नव्याने व्यवसाय परवाने देण्यात येऊ  नये, असा प्रस्ताव देखील काही वर्षांपूर्वी महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता.

पोलिसांच्या मागणीनुसार अनधिकृत बांधकाम केलेल्या २३ लॉजवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. यावेळी लॉजमध्ये करण्यात आलेले अंतर्गत बदल उद्ध्वस्त करण्यात आले. परंतु त्यानंतर कारवाई अचानक थंडावली आणि आता कारवाई झालेल्या अनेक लॉजमध्ये पुन्हा पहिल्यासारखीच अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि ही बाब खुद्द लोकप्रतिनिधींनीच सभागृहात उघडकीस आणली आहे. शिवाय महासभेच्या निर्णयानंतरही अनेक लॉजना परवाने देण्यात आले आहेत आणि यातील ८० टक्क्यांहून अधिक लॉजनी त्याचे नूतनीकरणच केले नसल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

शहरातील वाढत्या अनधिकृत लॉजसंस्कृतीला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी लॉजमधील अनधिकृत बांधाकामांवरील कारवाई पुन्हा सुरू करून अनधिकृत लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु काही लॉजमालकांचे थेट राजकीय लागेबांधे आहेत, तर काही लॉजमालक स्वत:च राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे प्रशासनाने कितीही मनात आणले तरी ही कारवाई होणार का आणि कारवाई झाली तरी ती किती काळ टिकणार हाच खरा प्रश्न आहे. मात्र शहराची खरी ओळख जपण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई व्हायला हवी हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.