संचालक, अभियंते लाभार्थी; श्रीनिवास मिल पुनर्विकास प्रकल्प

लोअर परळ येथील खासगी श्रीनिवास मिलच्या भूखंडावर जागतिक किर्तीचा ‘वर्ल्डवन’ हा उत्तुंग टॉवर उभारणाऱ्या लोढा बिल्डर्सच्या तत्कालीन  संचालक तसेच अभियंत्यानी १२ भाडेकरूंची फसवणूक करून घरे लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या कृतीचे लोढा बिल्डर्सतर्फे समर्थन करण्यात आले असून त्यात काहीही गैर नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.

श्रीनिवास मिल ही १९९३ मध्ये दिवाळखोरीत निघाली आणि या गिरणीचा ताबा उच्च न्यायालयाच्या अवसायन (लिक्विडेटर) विभागाने घेतला. लोढा डेव्हलपर्सन आपल्या महत्त्वाकांक्षी वर्ल्डवन या प्रकल्पाचा पाया रोवला. या नियमानुसार एक तृतीयांश भागात विद्यमान भाडेकरूंना घरे बांधून देणे बंधनकारक होते. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या भाडेकरूंची पात्रता यादी जारी केली. त्यापैकी १३२ भाडेकरूंना पात्र तर १८ भाडेकरूंना अपात्र ठरविले. हे आदेश येताच यापैकी १२ भाडेकरूंना तुमची घरे आता जमीनदोस्त केली जातील. तुम्हाला काहीही लाभ मिळणार नाही, असे सांगत लोढा बिल्डर्सने ही घरे नोंदणीकृत नसलेल्या मुखत्यारपत्र तसेच करारनाम्याच्या जोरावर ताब्यात घेतली. या बदल्यात १२ भाडेकरूंची फुटकळ  मोबदला देऊन बोळवण करण्यात आली. आपल्याला घरे मिळणार नाहीत, असे वाटून मिळालेली रक्कम पदरात घेत हे भाडेकरू निघून गेले. परंतु महापालिकेने उर्वरित १८ भाडेकरूंची यादी अंतिम करण्यासाठी जी नोटिस काढली त्यात आपली नावे पाहून आपण फसविले गेल्याचे या भाडेकरूंना समजून चुकले. या भाडेकरूंच्या नावासमोर लोढा बिल्डर्सचे संचालक, अभियंते आणि कर्मचारी यांची नावे नमूद असल्यामुळे भाडेकरू हादरले. ही घरे लाटण्यातच आली आहेत, असा आरोप भाडेकरूंचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या अ‍ॅड. सागर कांबळे यांनी केला आहे.

या इमारतीत १२ जणांना घर मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मध्य मुंबईत स्वत:चे घर असणे ही स्वागतार्ह बाब आहे. कंपनीचा कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत खरेदीदाराशी संबंध नाही, असे लोढा बिल्डर्सने म्हटले आहे.

लोढा डेव्हलपर्सचे संचालक/अभियंते (कंसात ज्या भाडेकरूंची मूळ घरे आहेत त्यांची नावे) : बीरेन मेहता (विजय जामसंडेकर), करन गुप्ता (सुवर्णा निमांडे), उदय घमरे (सुनंदा पोकळे), सुरेंद्र नायर (जयश्री तोडकरी), केशव पांडे (स्वाती नलावडे), सुमेध जाधव (अजय परब आणि सविता बिरवडकर अशी दोन घरे), सागर गावडे (शीला जाधव), मार्टिन गोडार्ड (आशा परब), संदीप सक्सेना (भगवान पाटील), मनिंदर छाब्रा (जितेंद्र परब), पिंकेश रोहितकुमार शाह (हिराराम सुतार).

खासगी गिरणीच्या भूखंडावर १३२ भाडेकरूंचे मोफत पुनर्वसन करण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. चाळींचा पुनर्विकास करून विकासकांना मिळतो तसे चटईक्षेत्रफळ या प्रकल्पात मिळालेले नाही. संपूर्ण खर्च कंपनीने उचलला आहे – अभिषेक लोढा, व्यवस्थापकीय संचालक, लोढा डेव्हलपर्स