कसलाही दुवा नसताना केवळ तर्क आणि तांत्रिक बाबींच्या आधारे वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शोधून काढले. आलम अन्सारी असे त्याचे नाव असून त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पीडित मुलीला २१ एप्रिल रोजी तिच्या घराजवळून उचलून नेऊन अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जन जागेवर नेऊन अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला होता. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथके स्थापन केली होती. पण हाती कसलाच दुवा नव्हता. याबाबत माहिती देताना वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांनी सांगितले की, आम्ही अगदीच अस्पष्ट असलेल्या सीसीटीव्ही वरून संशयिताचे रेखाचित्र तयार केले होते. त्या आधारे या भागातील ४५ जणांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या शरीरयष्टीशी मिळतेजुळते असलेल्या त्यातील एकूण ६ जणांना बाजूला काढले. त्या ६ जणांमधूनही तर्क लावून दोन जण निवडले आणि चौकशी सुरू केली. आलम अन्सारी हा ताडदेवला राहणारा असून तो अँटॉप हिल परिसरात कपडय़ाच्या दुकानात काम करतो. दररोज तो ११ वाजता घरी पोहोचतो. घटनेच्या दिवशी त्याचे मोबाइल लोकेशन काढले. तेव्हा तो १२ वाजता घरी पोहोचला होता. त्या एका धाग्यावरून आम्ही त्याला बोलते केले. परंतु अद्याप त्याने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिलेली नाही.  
आमच्या हद्दीत एकूण ११ निर्जन स्थळे असून त्या भागातील झाडे कापावीत, तेथे दिवे आणि सीसीटीव्ही लावावेत अशा सूचना आम्ही पालिका, म्हाडा, एमएमआरडीए आदींना सहा महिन्यांपूर्वी केल्या होत्या. परंतु कुणीच प्रतिसाद दिला नाही, असे ते म्हणाले. या भागातील वाढत्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती महिला बाल विकास आणि महिला आयोगाला पोलिसांनी केली होती.