एसटी महामंडळाचा लेटलतिफ कारभार आणि आचारसंहिता यामुळे एप्रिल ते जून या गर्दीच्या काळात टप्याटप्यात येणाऱ्या १,३०० नवीन बस गाडय़ांना  ब्रेक लागला आहे. या गाडय़ांसाठी देण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा प्रक्रियेला महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आणि ११ मार्चपासून आचारसंहिता लागताच निविदा प्रक्रिया पूर्णपणे थांबली. त्यामुळे या नवीन बस गाडय़ा आता गर्दीचा हंगाम संपल्यानंतरच दाखल होणार आहेत.

एसटी महांडळाने टू बाय टू परिवर्तन, स्लीपर आणि सीटर अशा दोन्ही सेवा असलेली एसटी तसेच वातानुकूलित शिवशाही अशा १,३०० नवीन बस गाडय़ांसाठी बाहेरून सांगाडा खरेदी आणि बस बांधणीची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होतीआणि २ मार्चपर्यंत अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते. निविदेवर निर्णय झाला असता तर ४५ दिवसानंतर म्हणजे गर्दीचा हंगाम असलेल्या १५ एप्रिलनंतर टप्याटप्यात या गाडय़ा येण्यास सुरूवात झाली असती. मात्र एसटी महामंडळाकडून निविदेमध्ये वारंवार काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले गेले आणि ही प्रक्रिया पुढे गेली. त्यातच ११ मार्चपासून लोकसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसिहता लागू झाली आणि त्यामुळे महामंडळ कामाचे आदेशही काढू शकले नाही. राज्यातील निवडणुका २९ एप्रिल रोजी संपत आहेत. त्यावेळी आचारसिहता शिथिल होत असल्याने त्यानंतरच १,३०० बस गाडय़ांच्या कामाचे आदेश काढून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

१,३०० बस गाडय़ांसाठी लागणारा सांगाडा हा बाहेरून खरेदी करतानाच बस बांधणीदेखिल बाहेरुन केली जाणार आहे. परंतु नमुना बस गाडय़ांची प्रक्रिया राबवतानाच प्रत्यक्षात येणाऱ्या बस गाडय़ांची निविदा आणि कामाचे आदेश वेळेत पूर्ण झाले असते तर आचारसंहितेत या बस गाडय़ा अडकल्या नसत्या आणि गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल झाल्या असत्या.

या गाडय़ांसाठीच्या नमुना बसचे काम आधीच सुरू आहे त्यामुळे ते रखडणार नाही. १,३०० नवीन गाडय़ांसाठी प्रत्यक्षात कामाचा आदेश तांत्रिक कारणास्तव काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या बस टप्प्याटप्यात दोन महिन्यांनी दाखल होतील.      – रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

कोणत्या गाडय़ा?

  • ७०० टू बाय टू साध्या परिवर्तन बस
  • २०० स्लीपर आणि आसन असे दोन्ही प्रकार एकाच बसमध्ये असलेल्या गाडय़ा
  • ४०० वातानुकूलित शिवशाही बस