मुंबई : ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘अरे देशात आवाज कुणाचा, नरेंद्र मोदींचा’ असा नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष गुरुवारी सकाळपासूनच मुंबईतील भाजप कार्यालयासमोर सुरू होता. या जयघोषाला ढोलताशा, तुतारीची साथ मिळाली होती. निकालाचे कल स्पष्ट होत गेले, तसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत टिपेला पोहोचला. आमदार आणि नेतेही या उत्साहात सहभागी झाले.

भाजपप्रणीत सरकारच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून स्पष्ट झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासूनच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मुंबईतील प्रदेश कार्यालय बुधवारी सायंकाळपासून रोषणाईने सजले होते. कार्यालयाच्या परिसरात भाजपचे झेंडे आणि पताका लावण्यात आल्या होत्या. कार्यालयासमोरच्या रस्त्यावर मोंदीच्या भल्या मोठय़ा प्रतिमा झळकत होत्या.

गुरुवारी सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर गोळा होत होते. कार्यालयाशेजारीच लावलेल्या टीव्ही स्क्रीनकडे त्यांचे डोळे लागले होते. सकाळी नऊनंतर निकालाचा कल स्पष्ट होऊ लागला आणि उत्सुकतेचे रूपांतर उत्साहात जल्लोषात झाले. नाशिक ढोलाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला. भाजपचे नेते, आमदार कार्यालयात पोहोचले. तेही कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी झाले. आमदार अतुळ भातखळकर, मुंबईचे संघटनमंत्री सुनील कर्जतकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह ताल धरला. त्यामुळे उत्साह आणखी वाढला.

हळूहळू सूर्य तळपू लागला. मात्र भाजप कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांची गर्दी काही कमी झाली नाही. उकाडा सहन करत कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोरील जल्लोषात सामील होत होते. मोदी आणि भाजपचा जयघोष करत भगवे झेंडे फडकवत होते. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीने त्यात भर घातली.

गर्दीमुळे वाहतूक सुरळीत ठेवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.जल्लोषाचा फटका वाहतुकीला बसू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली.

नेत्यांची रीघ

महायुतीच्या विजय निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले भाजप कार्यालयात आले आणि कार्यकर्त्यांसह विजयोत्सव साजरा केला. शेलार यांनी या वेळी दंडवत घालून मतदारांचे आभार मानले. तर मुख्यमंत्र्यांनी आज विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि उद्यापासून कामाला लागू, असे आवाहन कार्यकर्त्यांना केला. या वेळी आठवले यांनी ‘मैने नया गीत गाया, और मोदी को वापस लाया’ अशी आपल्या खास शैलीतील कविता सादर करत कार्यकर्त्यांची करमणूक केली.