विश्वचषक, विविध मालिकांचा उल्लेख करून टिप्पणी

मुंबई : ‘कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर’, ‘यापेक्षा एक्झिट पोलचे आकडे बरे होते’, ‘याला वाटतंय विश्वचषकही आपण जिंकून आणू’ (मोदी शहांकडे बोट दाखवत), ‘विराट कोहलीवर विश्वचषक जिंकण्याचे दडपण’, ‘रवी शास्त्रींच्या जागी अमित शहा येणार’, ‘निकालाचा सगळ्यात जास्त फायदा विवेक ओबेरॉयला होणार’, ‘आजि मोदीयाचा दिनू, रडे सोनियाचा सोनू’ अशा विनोदी, उपहासात्मक टिप्पणी आणि मीम्सच्या माध्यमातून शुक्रवारी समाजमाध्यमांवर धमाल सुरू होती.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासूनच समाजमाध्यमांवर विनोद आणि टोकाच्या व्यक्तिगत प्रतिक्रियांना उधाण आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी (नमो व्हर्सेस रागा), चौकीदार म्हणून प्रचारबाजी, राज ठाकरे यांचे गाजलेले व्हिडीओ-नाटय़, रामदास आठवलेंची काव्यप्रतिभा, कलाकारांचे निवडणुकीसाठी उभे राहणे, पुलवामा दहशतवादी हल्ला, राफेल प्रकरण अशा अनेक मुद्दय़ांवर निकालाच्या दिवसांपर्यंत समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटल्या.

काही दिवसांपासून ‘द मॉन्क हू सोल्ड हिज ऑपोझिशन फेरारी’ असे लिहिलेली मोदींची केदारनाथ दर्शनाची छायाचित्रे, ‘सेक्रेड गेम्स २’मधील गुरुजीबरोबर मोदींचा केदारनाथ येथील फोटो, निवडणुकीचा निकाल ‘नीचेसे देखना शुरू करो’, असे काँग्रेसचे म्हणणे, अर्णब गोस्वामी यांचे सनी देओलला सनी लिओन म्हणणे, राज ठाक रे शरद पवार यांच्या दारी पैसे मागायला गेल्याचे छायाचित्र, ‘निवडणुकीच्या निकालाची बात सोडा, मनोरंजन तर झाले ना’ अशा आशयाच्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होत्या.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील काही गाजलेली वाक्येही नेटक ऱ्यांनी पोस्ट केली. ‘जिंकणे आणि हरणे सुरूच राहील, पण भारत देश राहिला पाहिजे’ या वाक्यातून देशभावना प्रकट करण्यात आली. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, अ‍ॅव्हेंजर्स’मधील व्यक्तिरेखांचा वापर करत ‘मोदी इज किंग’च्या भावना नेटकरी व्यक्त करत होते. मागील निवडणुकीप्रमाणेच या वेळीही नेटक ऱ्यांची कल्पकता आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला.

ट्रेंडिंग हॅशटॅग

‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ या नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटनंतर ‘विजयी भारत’ या दोन शब्दांचा ट्रेंड पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळाला. त्याआधी ‘लोकसभा इलेक्शन २०१९, अमेठी, आयेगा तो मोदी, मोदी आ गया, इलेक्शन रिझल्ट २०१९, मोदी फिरसे, जय हिंदू’ असे काही हॅशटॅग ट्रेंड होताना दिसले.