भाजपची पहिली उमेदवार यादी; नगरचे दिलीप गांधी, लातूरचे सुनील गायकवाड यांना फेरउमेदवारी नाकारली 

मुंबई : भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील १४ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली असली, तरी ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, पुण्याचे अनिल शिरोळे यांच्यासह सहा खासदारांचे भवितव्य अधांतरी आहे.

राज्यात भाजपचे २२ खासदार आहेत. नितीन गडकरी, हसंराज अहिर, डॉ. सुभाष भामरे हे तीन मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह १४ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नगरचे दिलीप गांधी आणि लातूरचे सुनील गायकवाड या दोन विद्यमान खासदारांना फेरउमेदवारी नाकारण्यात आली आहे. सहा मतदारसंघांबाबतचा निर्णय अद्याप अनिर्णित आहे.

ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या हे मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सतत सक्रिय असतात. रेल्वे, पायाभूत सुविधा, आरोग्य आदी प्रश्नांबाबत ते सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस राज्य भाजपने केली होती. पण गेल्या शनिवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील नेत्यांच्या बैठकीत सोमय्या यांच्याबरोबरच दुसऱ्या नावाची शिफारस करावी, असे सुचविण्यात आले. यानुसार मुख्यमंत्री फडवणीस यांनी दुसरे नाव दिल्लीला पाठविले आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला मुख्यत्वे शिवसेनेचा आक्षेप आहे. भाजप आणि शिवसेनेत कटुता तीव्र असताना सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. ठाकरे यांच्याशी संबंधित कंपन्या, या कंपन्यांचे व्यवहार याची माहिती सोमय्या यांनी जाहीर केली होती. तसेच ठाकरे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीची मागणी केली होती. शिवसेना आणि सोमय्या यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. सोमय्या हे उमेदवार असल्यास शिवसेनेची मदत भाजपला मिळू शकणार नाही.

शिवसेनेप्रमाणेच मोदी व शहा यांच्या मनातून सोमय्या हे उतरले होते. २०१४ मध्ये सत्ता येताच भाजप सरकारने मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या भाडय़ात वाढ केली होती. यावरून सोमय्या यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आवडले नव्हते, असे सांगण्यात येते. सोमय्या यांच्याकडे कामगार खात्याच्या समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत मोदी व शहा यांच्या पातळीवर आता निर्णय घेतला जाईल. सोमय्या हे मात्र उमेदवारीबाबत आशादायी आहेत.

पुण्यात अनिल शिरोळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध झाला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाचीही चर्चा आहे. पुण्यात निर्माण झालेल्या घोळाच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. सोलापूरमध्ये विद्यमान खासदार शरद बनसोडे हे निष्क्रिय असल्याची टीका झाली होती. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या बडय़ा प्रतिस्पध्र्याशी सामना करण्याकरिता भाजपचे नेते पर्यायांच्या शोधात आहेत.

जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यांच्याबाबतची आक्षेपार्ह क्लिप समाज माध्यमांवर मधल्या काळात गाजली होती. निवडणुकीत याचा त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्याने भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांच्याबाबत पक्षात अनुकूल मत नाही. राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्याने डॉ. भारती पवार या उद्याच भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्या नावाचा कदाचित विचार होऊ शकतो.

गेल्या वर्षी पोटनिवडणुकीत विजयी झालेले पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची विचित्र कोंडी झाली आहे. युतीत पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे सोपविण्यात आल्याची चर्चा असली तरी अधिकृतपणे तसे जाहीर झालेले नाही. पक्षाकडून त्यांना ठोस असे कोणतेच आश्वासन दिले जात नाही. पालघर नगरपालिकेची निवडणूक येत्या रविवारी असून, ती पार पडल्यावरच निर्णय घेतला जाईल.

या खासदारांचे भवितव्य अनिश्चित

* किरीट सोमय्या (ईशान्य मुंबई)

* अनिल शिरोळे (पुणे)

* शरद बनसोडे (सोलापूर)

* ए. टी. नाना पाटील (जळगाव)

* हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी)

* राजेंद्र गावित (पालघर)