मुंबई : भाजप कार्यालयात दोन दिवस आधीच विजयोत्सवाची तयारी सुरू झाली असताना काँग्रेसच्या कार्यालयाला मात्र, अपयशाची चाहूल लागल्याचे दिसत होते. कार्यकर्ते, उदासीन असल्याचे दिसत होते.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यालय (दादरमधील टिळक भवन) निकालाचा अंदाज येताच शांत झाले. चार-दोन पोलीस आणि काही कर्मचाऱ्यांखेरीज तिथे कुणीही फिरकले नाही. ना पत्रकारांची गर्दी, ना सभा, ना बैठका. सचिन सावंत यांना निकालाविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘भाजपने संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ न केलेले कार्य, लोकांचा असंतोष आणि राज ठाकरे यांच्या सभा यांचा प्रभाव जाणवत असताना निकाल मात्र काहीसे धक्कादायक लागले. आम्ही जनतेचा कौल स्वीकारला आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या चुका सुधारण्याची संधी या सरकारला मिळाली आहे. त्या त्यांनी सुधाराव्यात अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट

मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात गुरुवारी मोजकेच कार्यकर्ते होते. कल जाहीर होऊ लागल्यानंतर तेदेखील पांगले. कार्यालयात मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशिवाय एकही मोठा नेता किंवा पदाधिकारी नव्हता.

सकाळपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, १०-१५ कार्यकर्ते व दोन-चार पत्रकार याशिवाय कोणीही कार्यालयाकडे फिरकले नाही. एखाद्या वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन येऊन प्रतिक्रिया घेऊन लगेच निघून जात होती.  वर्तमानपत्रांचे पत्रकारही चर्चा करून काढता पाय घेत होते. सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे वृत्त दुपारी दोनच्या सुमारास समजताच कार्यकर्त्यांत काही प्रमाणात उत्साह निर्माण झाला. नंतर सुनील तटकरे यांच्याही विजयाची बातमी आली.

‘वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात १०-१२ ठिकाणी फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीच त्यांचा वापर आमच्याविरोधात केला, असा आरोपही मलिक यांनी केला. निवडणुकीत शिवसेना-भाजपने धर्माच्या नावानेही प्रचार केला. आमचे दहा किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा होती,’ अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.