सत्तेतील निम्मा वाटा, हव्या तितक्या जागांचा हट्ट सोडावा लागणार

लोकसभा निवडणुकीसाठी युतीला राजी होताना भाजपच्या गरजेचा फायदा उठवत जागावाटपात एक जागा जास्त हवी हा हट्ट धरून तो मान्य करण्यास शिवसेनेने भाग पाडले असले तरी आता लोकसभेत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवल्याने शिवसेनेची वाटाघाटींची ताकद क्षीण होणार आहे. सत्तेत हवा तसा निम्मा वाटा, विधानसभेसाठी हव्या त्या जागा वाढवून घेणे यासारखे लाड आता भाजप पुरवणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीआधी वर्षभर शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली होती. पण गरजवंत असलेल्या भाजपने नमते घेत युतीच्या विनवण्या सुरूच ठेवल्या. त्यानंतर युतीसाठी वाटाघाटी सुरू झाल्यानंतर पूर्वीचे भाजप २६ आणि शिवसेना २२ हे सूत्र मान्य करण्यास शिवसेनेने नकार दिला. बिहारमध्ये नितीश कुमार यांना जागा वाढवून देता तर आम्हाला का नाही, असा पवित्रा घेत आणखी एक जागा वाढवून हवी, असा हट्ट उद्धव ठाकरे यांनी धरला होता.

त्याचबरोबर पालघरची २३ वी जागा मागून घेतली. इतकेच नव्हे तर पालघरची जागा भाजपच्या विद्यमान खासदारासह शिवसेनेच्या पदरात पाडून घेतली. त्याचबरोबर पुढील सरकारमध्ये सत्तेत निम्मा वाटा सेनेला मिळायला हवा, ही अटही मान्य करायला भाग पाडली.

लोकसभा निवडणुकीचे निकाल युतीमधील सत्तासमीकरणाचे संतुलन ठरवण्यात महत्त्वाच्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. रालोआतील घटक पक्षांचा टेकू महत्त्वाचा राहील, असा शिवसेनेचा कयास होता. शिवसेनेने १८ जागा मिळवत चांगले यश मिळवले. पण त्याच वेळी भाजपला केवळ स्वबळावरच सत्ता मिळाली असे नव्हे तर जागाही वाढल्या. त्यामुळे भाजपची शक्ती वाढल्याने आता रालोआतील घटक पक्षांची राजकीय वाटाघाटींमधील सौदाशक्ती क्षीण झाली आहे. परिणामी आता पालघरच्या जागेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत जागावाटपात मनमानी करता येणार नाही. भाजपशी आता सौदेबाजी करता येणार नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. युती होईलच पण ती दोघांचा सन्मान ठेवणारी असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.