सेनाभवनासमोर शिवसैनिकांची नवीन घोषणा

मुंबई : दुपारी एकच्या सुमारास मतमोजणीचे कल स्पष्ट होऊ लागताच ‘मराठी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला,’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सेनाभवनासमोर जल्लोष सुरू केला. ‘येऊन येऊन येणार कोण,’ ‘आला रे आला शिवसेनाचा वाघ आला.’ अशा नेहमीच्या घोषणांना यावेळी नव्या घोषणेची आणि ढोल-ताशांच्या तालाची जोड मिळाली.

मतमोजणीची माहिती देण्यासाठी सकाळपासूनच सेनाभवनासमोर भला मोठा पडदा लावण्यात आला होता. कार्यकर्त्यांची गर्दी होती, मात्र खरा जल्लोष सुरू झाला तो दुपारीच. युतीने राज्यभरातील जागांवर घेतलेली आघाडी दुपारी एकच्या आसपास स्पष्ट होताच वातावरणातील उत्साह वाढला. अनेक महिला शिवसैनिक ढोल ताशांच्या जोरावर जल्लोषात घोषणा देऊ लागल्या. सारा परिसर गुलालाने भरून गेला. मध्येच एखादा अतिउत्साही शिवसैनिक हातात गुलाल घेऊन अद्याप गुलालात न रंगलेल्या कार्यकर्त्यांना गुलालाने माखून टाकू लागला. सेनाभवनाचा परिसर दणाणू लागला. सेनाभवनात अजून कोणताही मोठा नेता आलेला नसला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला पोहचला होता. मध्येच एखादे मिनीट उसंत घेऊन परत नव्याने ढोल ताशावर ताल धरला जात होता.

कोणत्या मतदारसंघात कोण किती मतांनी पुढे आहे, आपल्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे याची चर्चा सुरू होतीच. पण तेवढय़ात एका उत्साही कार्यकर्त्यांने एक टिप्पणी केली, ‘शिवाजी पार्कच्या जवळून आवाज येत आहे, काका मला वाचवा, काका मला वाचवा.’ त्याला सर्वानीच अगदी दिलखुलास दाद दिली.

मोठय़ा स्क्रीनवरील अपडेट जसजसे स्पष्ट होत होते तसा जल्लोषाला जोर येत होता. स्क्रीनवर शिवसेनेचा एखादा निकाल किंवा कल जाहीर झाला की आवाज टिपेला पोहोचत होता. मध्येच स्क्रीनवर शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे या आढळराव पाटील यांच्या पराभवाबद्दल बोलत असताना काही क्षण सारेचजण स्तब्ध झाले. तेवढय़ात अशोक चव्हाणांच्या पराभवाची बातमी आल्यावर सर्वाना चेव आला आणि ढोल ताशे पुन्हा जोरात वाजू लागले.

‘दिवाळी साजरी’

भाजपाने बुधवारपासूनच जल्लोषाची तयारी सुरू केली होती. तुलनेने सेनेची भूमिका सावध होती. त्यामुळे सेनाभवनाच्या रोषणाईची तयारीदेखील दुपारी दोन नंतरच सुरू झाली. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत विजेच्या शेकडो माळांनी भरलेला टेम्पो दारात दाखल झाला. त्यातील सामान उतरताना पाहून एका कार्यकर्ता म्हणाला ही तर दिवाळीची तयारी आहे. सेनाभवनासमोर दिवाळीच साजरी होत होती.