उत्तर पश्चिम मुंबईतही झोपडपट्टीबहुल भागांत चांगले मतदान

मुंबई : उन्हाच्या झळा, घामाच्या धारा यामुळे जीव कातावला असतानाही उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील मतदारांनी आपला उत्साह कमी होऊ न देता मतदानाचा हक्क बजावला. उच्चभ्रू आणि झोपडपट्टी अशी संमिश्र वसाहती असलेल्या या मतदारसंघात मतदांरांचा प्रतिसादही संमिश्रच होता. यारी रोड, वर्सोवा, चार बंगला, लोखंडवाला अशा उच्चभ्रू वसाहतींमध्ये लोकांचा अगदीच तुरळक प्रतिसाद होता, तर झोपडपट्टय़ा, मध्यमवर्गीयांच्या वसाहतींमधील मतदारांनी मात्र मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात ५०.४४ टक्के मतदान झाले होते.

उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार संजय निरुपम यांच्यात मुख्य लढत होती. या मतदारसंघात १७२८ मतदान केंद्रे होती. मतदान केंद्रांवर आज मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदार येण्यास सुरुवात झाली होती. युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी गोरेगाव येथील पहाडी मनपा शाळेत मतदानाचा हक्क बजावला. या वेळी सर्वानी आवर्जून मतदान करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले, तर शिवसेनेचे आमदार माजी महापौर सुनील प्रभू यांनी दिंडोशीच्या यशोधाम शाळेत मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत पत्नी आणि मुलीसह मतदान केले. निरुपम यांनी गेल्या वेळेस उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु ते उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतदार असल्यामुळे त्यांना स्वत:ला मतदान करता आले नव्हते. मात्र या वेळी त्यांनी स्वत:ला मतदान केले. तर त्यांची मुलगी ही नवमतदार असून तिने आपले पहिले मत वडिलांनाच दिल्याचा आनंद तिने या वेळी व्यक्त केला. वर्सोवा यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल या केंद्रावर चार बंगला परिसरातील बॉलीवूडमधील अनेक तारे-तारकांनी मतदान केले. तर आज सकाळी साडेसात वाजता अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी मतदान केले आणि सखी मतदान केंद्राचा शुभारंभ केला.

मतदान केंद्राच्या बाहेर आपले नाव मतदार यादीत शोधणाऱ्यांचीही तुरळक गर्दी होती. अनेक जण मोबाइलच्या मदतीनेच आपले नाव शोधत होते. दिव्यांगांसाठी असलेल्या व्हीलचेअर व डोली या सुविधांचाही मतदारांनी चांगला लाभ घेतला. दुपारी ऊन वाढल्यानंतर मतदारांचा उत्साह मावळला होता. मात्र त्या वेळी झोपडपट्टी परिसरातील लोकांच्या रांगांमध्ये मात्र खंड पडला नाही. तर उच्चभ्रू परिसरातील मतदान केंद्रांवर मात्र शुकशुकाट पसरला होता. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावत होते. शिवसेना आणि भाजपकडे कार्यकर्त्यांचे जाळे असल्यामुळे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पट्टय़ातल्या लोकांना ते बाहेर काढत होते. जोगेश्वरी बेहराम बाग परिसरात शिवसेनेने आपले पारंपरिक मुस्लीम मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यात यश मिळवले. तर निरुपम यांच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी जोर लावला होता. संध्याकाळी कामावरून परतलेले मुंबईकर, मोलमजुरी करून येणारे कामगार यांनीही मतदान करावे याकरिता प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धडपडत होते.