मतदान यंत्रावरील शाईच्या खुणेमुळे मुलुंडमध्ये गोंधळाचे वातावरण

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ईशान्य मुंबईत नवमतदारांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी केंद्रांवर दिसले. यात उत्साह होता, हुरहुरही होती आणि अफवांमुळे थोडा संभ्रमही होता.

सकाळी सातच्या सुमारास या मतदारसंघातील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी संजय पाटील, मनोज कोटक यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले. पाटील यांनी भांडुप पश्चिमेकडील आयडीयूबीएस महाविद्यालयातील केंद्रावर तर कोटक यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथील केंद्रावर मतदान बजावले. मतदान सुरू होण्याआधीपासूनच येथील बहुतांश केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यात मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या मध्यमवयीन, वृद्ध आणि नोकरदार वर्गाचा सहभाग होता. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना १५ ते २० मिनिटे रांगेत उभे राहावे लागले. सकाळच्या वेळेतली केंद्रांवरील गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. सकाळी दहा वाजल्यानंतर महिलांची गर्दी केंद्रांवर दिसू लागली.

येथील प्रत्येक केंद्रावर कडेकोट बंदोबस्त होता. बंदोबस्तावरील पोलीस, निवडणूक कर्मचारी केंद्रावर आलेल्या मतदारांना बूथप्रमाणे मार्गदर्शन करत होते. येथील बहुतांश केंद्रांवर पुरुष, महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था दिसली. पोलीस रांगेतील वृद्धांना, ज्येष्ठ नागरिकांना थेट केंद्रात आणताना दिसले. अपंग, वयोवृद्धांसाठी खुर्चीला बांबू जोडून केलेल्या तात्पुरत्या पालख्या सज्ज होत्या. मोठय़ा केंद्रांवर प्रथमोपचार पुरवणारे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका तैनात होत्या.

मतदान उत्साहात सुरू असताना मुलुंडच्या होली एंजल मतदान केंद्रातील मतपेटीवर भाजप उमेदवाराच्या नावापुढे शाईने खूण केल्याची अफवा उठली. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनीच ही तक्रार केली आणि मतदान तासाभरासाठी खोळंबले. प्रत्यक्षात या मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या तुलनेने जास्त होती. प्रत्यक्ष मतदानाआधीच्या प्रक्रियेत स्वाक्षरी किंवा अंगठय़ाचा ठसा उमटवणे बंधनकारक होते. ज्येष्ठांपैकी अनेकांनी अंगठा उमटवला. अंगठय़ावरील शाई बटणाच्या आसपास पसरली, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. यंत्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. असाचा गोंधळ मुलुंड पूर्वेकडील पुरंदरे शाळेतील केंद्रावरही घडला होता.