४९ टक्के मतदान; वांद्रे, विलेपार्ले, कुर्ला परिसरात मतदारांची गर्दी

मुंबई : मुंबईतील उन्हाचा तडाखा आणि सलग आलेल्या सुट्टय़ा अशी कारणे असूनही उत्तर मध्य मुंबईतील मतदारांनी सकाळी आणि संध्याकाळी मोठय़ा प्रमाणावर मतदान केले. त्यामुळे या मतदारसंघांत संध्याकाळी पाचपर्यंत ४९ टक्के मतदान झाले.

वांद्रे, विलेपार्ले, कुर्ला परिसरात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. मात्र दुपारी १२ नंतर उन्हाचा कडाका वाढला तशी गर्दी ओसरली. दुपारी १२ ते ३ यावेळेत मतदान केंद्रावर विशेष गर्दी नव्हती. दुपारी साडेतीननंतर पारा खाली सरकण्यास सुरुवात झाली आणि पुन्हा रांगा लागल्या.

वांद्रे पूर्व भागातील बेहरामपाडा या मुस्लीमबहुल भागामध्ये दुपारी १ पर्यंत २६ टक्के मतदान झाले होते. परंतु चारच्या सुमारास या भागातील मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा लागल्या. मतदार यादीमध्ये नावे नसल्याची तक्रार घेऊन अनेक मतदार निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांसमोर जमले होते. या कर्मचाऱ्यांकडे लेखी याद्या असल्याने ते लोकांनाच या याद्यांमध्ये नावे शोधण्यास सांगत होते. वयोवृद्धांना त्या गर्दीत शिरून नाव शोधणे कठीण जात होते. ते कर्मचाऱ्यांना विनंती करून कंटाळलेले दिसत होते. काही तरुण इतरांची नावे मोबाइलवर ऑनलाइन शोधण्यास मदत करत होती. तर दुसरीकडे मोबाइल बंदी म्हणून पोलीस त्यांना ओरडत होते. शेवटी काही मुलांनी केंद्राच्या बाहेर जाऊन नावे शोधून देण्यास सुरुवात केली. लॅपटॉप किंवा मोबाइल वापरण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली असती, तर हा गोंधळ उडाला नसता, असे मत वांद्रे पूर्व भागातील एका निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्याने व्यक्त केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना केंद्रावर आणत होते.

कुर्ला नेहरूनगर भागामध्ये तरुणांची वर्दळ अधिक होती. सेल्फी घेण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. चुनाभट्टी भागातही मतदार याद्यांचा गोंधळ सुरूच होता. अनेक मतदार नाव शोधण्यासाठी एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर भटकत होते. मरिन ड्राइव्ह येथे राहणाऱ्या मंजू शहा मतदान करण्यासाठी चुनाभट्टीला आल्या होत्या. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नव्हते. ‘मी जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्यासाठी आले आहे. मात्र मतदान न करताच परत जावे लागणार,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मतदान केंद्रात जाताना मोबाइल फोन बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असल्या तरी आतमध्ये मात्र सर्रास मोबाइलचा वापर सुरू होता. शेवटच्या एका तासात भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन केले. दुपारी ३९ टक्क्य़ांपर्यत असलेला उत्तर मध्य मुंबईच्या मतदानाचा टक्का पुढील दोन तासांत १० टक्क्य़ांनी वाढून ४९ टक्क्यांवर पोहचला असावा.

बाहेर उन्हाच्या झळा लागत असल्या, तरी अनेक केंद्रे शाळांमध्ये असल्याने तिथे मात्र उन्हाचा विशेष त्रास होत नव्हता. मैदानात किंवा रस्त्यावर आलेल्या रांगामध्ये उन्हाच्या त्रासाने मतदार हैराण झाले होते. काही ठिकाणी कर्मचारी धिम्या गतीने काम करत असल्याच्या तक्रारी आयोगाच्या केंद्रावरील मुख्य अधिकाऱ्याकडे करण्यात आल्या. कर्मचारी आणि मतदारांमध्ये खटकेही उडत होते.

ठिकठिकाणी पक्ष कार्यकर्ते टेबल मांडून बसले होते, मात्र फारशी लगबग नव्हती. दुपारनंतर तो उत्साहही मावळला दिसत होता. मतदारही या टेबलांऐवजी थेट मतदान केंद्रावर जात होते.

सुविधांचे केवळ आश्वासनच!

नेहरू नगर भागातील अर्चना शेटय़े या ७५ वर्षांच्या असून त्यांना अजिबात चालता येत नव्हते. तरीही त्या वॉकर घेऊन आल्या होत्या. उत्तर मुंबईत केंद्रांवर व्हीलचेअर नव्हत्या. पाळणाघर म्हणून काही ठिकाणी खोल्या होत्या, मात्र तिथे आरोग्यसेविकाच नव्हत्या.  काही ठिकाणी मुलांना केंद्रावर जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये जाण्यास मनाई होती. त्यामुळे मुलांना बाहेरील व्यक्तीकडे सोडून पालकांना खोलीत जाऊन मतदान करण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रथमोपचार सुविधाही नव्हत्या. प्रथमोपचाराच्या नावाखाली पॅरासिटॅमॉल आणि ओरएसची पाकिटे होती.

नवविवाहित थेट मतदान केंद्रावर

कुर्ला नेहरू नगर येथील पंत वालावलकर केंद्रावर गळ्यामध्ये माळ घालून आलेला युवक दाखल झाल्यानंतर सर्वाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. २३ वर्षांचा इब्राहिम शेख लग्नानंतर थेट मतदान करण्यासाठी हजर झाला होता. लग्नाच्याच दिवशी प्रथमच मतदानाचा हक्क बजावत आहे. हा योगायोग जुळून आल्याचा आनंद आहे. सरकार निवडणे हा आपला हक्क आहे आणि यासाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत इब्राहिमने व्यक्त केले. इब्राहिमसोबत त्याचा भाऊ अख्तरही प्रथम मतदानासाठी आला होता.