News Flash

मतदारसंघ उत्तर मुंबई : चर्चेतल्या मतदारसंघाची मतदानातही सरशी

ज्येष्ठ नागरिकांसह नवमतदार यांच्या लांबच लांब रांगा दिवसभर मतदान केंद्रांवर लागल्या होत्या.

मतदान केंद्रांवरील सुविधांबद्दल समाधान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी पार पडलेल्या मतदानाला उत्तर मुंबई मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांसह नवमतदार यांच्या लांबच लांब रांगा दिवसभर मतदान केंद्रांवर लागल्या होत्या.

मतदारांसोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान खोलीत गर्दी असल्याने आई-वडील मुलांना या पाळणाघरात ठेवून जात होते. तेथे मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि पुन्हा घरी सोडण्यासाठी व्हीलचेअर कार उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम येथील जे. बी. खोत शाळेत सकाळी ७.३० वाजता मतदान केले. केंद्रावरची गर्दी पाहून त्यांनी मतदारांच्या उत्साहाचे कौतुक केले.

मतदान चिठ्ठीवरील यादी भाग क्रमांक पाहून मतदारांना त्यांच्या मतदान खोलीपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वयंसेवक करत होते. ज्येष्ठ नागरिक , अपंग, गरोदर महिला यांना रांगेत उभे न राहता सर्वात पुढे जाऊन मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विद्यार्थीही त्यांना मदत करण्यासाठी सज्ज होते. मतदान केंद्रावर मोबाइल न नेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. मतदान करून कामावर जाण्याच्या बेतात असलेल्यांची त्यामुळे पंचाईत झाली.

काही केंद्रांची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांवर सोपवून त्यांना सखी मतदान केंद्र असे नाव देण्यात आले होते. ही केंद्रे फुग्यांनी सजवण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फोटो बूथ उभारण्यात आले होते. ‘स्त्री शक्ती देशाची, ताकद लोकशाहीची’ असे घोषवाक्य लिहिलेल्या आणि ‘..मी मतदान केलं आणि तुम्ही?’ असे आवाहन करणाऱ्या बूथवर मतदार छायाचित्र काढत होते. गोराईत यंत्रात बिघाड झाल्याने मतदान उशिरा सुरू झाल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी केली.

 

ज्येष्ठांसाठी सुविधा

मतदान केंद्राजवळ वाहने नेण्यास बंदी आहे. त्यामुळे ठरावीक अंतरावर वाहन उभे करून चालत मतदान केंद्र गाठावे लागते. मात्र अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकरिता वाहन केंद्रापर्यंत नेण्यास परवानगी दिली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:30 am

Web Title: lok sabha election 2019 voting in north mumbai constituency
Next Stories
1 मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई : झोपडपट्टीत उत्साह, उच्चभ्रूंची पाठ
2 मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई : उन्हाच्या तडाख्यातही रांगा
3 ‘नोटा’द्वारे नेत्यांचा निषेध?
Just Now!
X