News Flash

मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई : झोपडपट्टीत उत्साह, उच्चभ्रूंची पाठ

झोपडपट्टी वस्त्यांमधील मतदारसकाळपासूनच मतदानासाठी घराबाहेर पडले.

शीव कोळीवाडा, धारावी, चेंबूर येथे मतदानासाठी रांगा

मुंबई : झोपडपट्टी परिसरांत मोठय़ा संख्येने मतदारांनी दिलेला प्रतिसाद, तुलनेत सामान्य व उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदारांनी फिरविलेली पाठ असे चित्र दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये होते. झोपडपट्टी वस्त्यांमधील मतदारसकाळपासूनच मतदानासाठी घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर लागलेल्या लांबच लांब रांगा आणि राजकीच पक्षांच्या असलेल्या बुथवर मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी मोठी गर्दी होती. त्याच्या उलट परिस्थिती सामान्य व उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होती.

दक्षिण मध्य मुंबईत शीव कोळीवाडा, धारावी, वडाळा, माहीम, चेंबूर, अणुशक्तीनगर येतात. धारावी मतदार संघातील मुकुंद नगर, ट्रान्सिट कॅम्प, एमजी रोड, संत कक्कया मार्ग, नाईबाबा नगर परिसरासह अन्य भागांत मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते. धारावी ट्रान्झिट कॅम्प शाळा, कामराजर मेमोरियल इंग्रजी हायस्कूल, संत कक्कया मनपा स्कूल, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्रात असलेला मोठा पोलीस बंदोबस्त व निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मिळणारी मदत पाहता शांततेत मतदान पार पडत होते. शीव कोळीवाडय़ातीलही भरणी नाका, कोयला गल्ली, चांदनी आगार, जी.टी.बी. नगर, विठ्ठल मंदिर परिसरातही मतदानाचा उत्साह होता. सायनमधील उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेल्या शिव शिक्षण संस्था प्रायमरी व सेकंडरी स्कूल आणि न्यू मनपा शाळांमध्ये मतदान शांततेत होत होते. या ठिकाणी मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता.

माहीम व दादर परिसरातील मतदान केंद्रात काही प्रमाणात चांगले मतदान झाले. परंतु दुपारपासून येथील मतदारांची संख्या कमीच होती. या परिसरातील बालमोहन शाळा, दादर विद्यामंदिर, छबिलदास सी.बी.एस. ई स्कूलसह अन्य मतदान केंद्रात दुपारपासून मतदानासाठी मात्र रांगा नव्हत्या. काही सेलिब्रेटी व राजकीय पक्षाचे उमेदवार, प्रतिनिधी यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातील एका मतदान केंद्रावर काही वेळ मशिनमध्ये बिघाड झाला होता. मात्र हा बिघाड तात्काळ दुरुस्त करून मतदान पार पडले. पंजाबी चाळ, बुद्ध विहार, सुंदर कॉलनी गल्ली,लाल डोंगर, माहुल गाव, आंबापाडा, वडाळातील सीताबाई चाळ, ज्ञानेश्वर वसाहत नगर आणि अणुशक्ती नगर या परिसरातील मतदारही मोठय़ा संख्येने मतदानाचा हक्क बजावला.

राज ठाकरे दीड तास रांगेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे यांनी पत्नी व दोन मुलांसह दादरमधील बालमोहन विद्यामंदिरात सकाळी साडे अकराच्या सुमारास मतदानासाठी आले. १४३ क्रमांकाच्या बुथवर ते मतदानासाठी दीड तास रांगेत उभे राहिले होते, अशी माहिती येथील झोनल अधिकारी प्रवीण येवलेकर यांनी दिली. येथे अनेक सेलिब्रेटींनी मतदान केले. तीनपर्यंत बालमोहन शाळेत ५० टक्के मतदान झाल्याचे ते म्हणाले.

याद्यांतील घोळ कायम

धारावी मतदारसंघात काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ कायम राहिला. ट्रान्झिट कॅम्प शाळेत मतदानासाठी आलेल्या दिलीप तिवारी या तरुणाचे नाव होते. तर त्याचे वडील व भावाचे दुसऱ्या मतदान केंद्रात नाव होते. मात्र आई, बायको व वहिनीचे नाव मतदार यादीत नव्हते. पाच वर्षांपूर्वी मतदान करूनही घरातील तीन जणांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली. याच परिसरात राहणारे व वयोवृद्ध असणारे इश्तिहाक खान यांचेही नाव मतदार यादीत नव्हते. याच ट्रान्झिट कॅम्पमध्ये आपल्या नातीसह आलेल्या खान यांनी मतदार यादीत नाव नसल्याने रोष व्यक्त केला. पाच वर्षांपूर्वी मतदान केले होते. त्यावेळी असलेली पावती, तसेच निवडणुकीचे कार्डही त्यांनी आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:27 am

Web Title: lok sabha election 2019 voting in south central mumbai constituency
Next Stories
1 मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई : उन्हाच्या तडाख्यातही रांगा
2 ‘नोटा’द्वारे नेत्यांचा निषेध?
3 मताचे मोल सांगणारी ‘त्या’ दोघींची धडपड
Just Now!
X