रवींद्र गायकवाडांना वगळले, पालघर, साताऱ्याची घोषणा उद्या

मुंबई : लोकसभेसाठी शिवसेनेने जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. अपवाद फक्त एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने वादग्रस्त ठरलेले उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा करण्यात आला आहे. सातारा आणि पालघर या दोन मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा रविवारी करण्यात येईल.

भाजपबरोबर युतीत शिवसेनेच्या वाटय़ाला २३ जागा आल्या आहेत. यापैकी २१ उमेदवारांची यादी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार अनिल देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. शिवसेनेच्या सध्याच्या १७ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव या ज्येष्ठ खासदारांना आणखी संधी मिळाली आहे.

एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने तसेच स्थानिक पातळीवरील नाराजी लक्षात घेऊन उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उस्मानाबाद मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मागील निवडणुकीत युतीच्या जागावाटपात साताऱ्याची जागा सेनेला सोडण्यात आली होती. ती सेनेने आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला सोडली होती.  साताऱ्यातून भाजपशी घरोबा केलेले माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे नाव घेतले जात आहे. पाटील यांनी शुक्रवारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. हे पाऊल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच उचलले असल्याचे सांगण्यात येते. सेनेच्या वाटय़ाची अतिरिक्त जागा कोणती हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पण पालघरच्या उमेदवारीचा निर्णय २४ तारखेला जाहीर करण्यात येईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. पालघर पालिकेची निवडणूक रविवारी असल्याने तोपर्यंत उमेदवारीचा निर्णय प्रलंबित ठेवला गेला असण्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे उमेदवार

’दक्षिण मुंबई – अरविंद सावंत

’दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

’उ. पश्चिम मुंबई- गजानन कीर्तिकर

’ठाणे – राजन विचारे

’कल्याण – श्रीकांत शिंदे

’रायगड – अनंत गीते

’सिंधुदुर्ग रत्नागिरी- विनायक राऊत

’नाशिक – हेमंत गोडसे

’शिर्डी – सदाशिव लोखंडे

’शिरूर – शिवाजीराव आढळराव-पाटील

’मावळ – श्रीरंग बारणे

’कोल्हापूर – संजय मंडलिक

’हातकणंगले – धैर्यशील माने

’संभाजीनगर – चंद्रकांत खैरे

’बुलढाणा – प्रतापराव जाधव

’अमरावती – आनंदराव अडसूळ

’परभणी – संजय जाधव

’धाराशिव – ओमराजे निंबाळकर

’हिंगोली – हेमंत पाटील

’यवतमाळ – भावना गवळी

’रामटेक – कृपाल तुमाणे