लोकसभेच्या निवडणुका गेल्यावेळेप्रमाणेच एप्रिल-मे मध्ये उन्हाळी सुट्टीतच होण्याची शक्यता आहे. मतदारयाद्यांच्या पुनर्रचनेचे काम देशभर सुरू असून ते २५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यानंतर निवडणुकांच्या तारखा घोषित होतील, असे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुका फेब्रुवारीत होतील, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. पण तशी कोणतीही शक्यता नसून निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या पुनर्रचनेचे काम सध्या सुरू आहे. मतदारयादीत नावनोंदणीची मुदत शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) संपत होती. ती २७ ऑक्टोबपर्यंत वाढविण्यात आली आहे. मतदारयाद्यांच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण करून अंतिम मतदारयादी जाहीर करण्याची मुदत महाराष्ट्रात ६ जानेवारीपर्यंत आहे. मात्र अन्य राज्यांमध्ये ती वेगवेगळी असून राष्ट्रीय मतदार दिनापर्यंत, म्हणजे २५ जानेवारी २०१४ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
२००९ मध्ये २ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा झाली होती. मतदान पाच टप्प्यांत १६ एप्रिल ते १३ मे या कालावधीत झाले होते. लोकसभेची मुदत ३१ मे २०१४ पर्यंत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यावर मतदानाची तयारी, अर्ज दाखल करण्याची मुदत, छाननी व अन्य प्रक्रियेसाठी मतदानाच्या तारखेपर्यंत किमान ४०-४५ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. साधारणपणे १५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होतात. तर उत्तरेकडे त्या उशीरा सुरू होऊन एप्रिलपर्यंत सुरू असतात. त्यामुळे मतदानकेंद्रांसाठी शाळा आणि निवडणूक कामासाठी शिक्षकांची उपलब्धता १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ापासून मेच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आयोगाची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.