जागावाटपावरून मित्रपक्षांत नाराजी कायम

मुंबई : राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी मुकाबला करण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य लहान पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडी आणि जागावाटपाची आज, शनिवारी  अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तरीही आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्यापही मिटलेला नाही. काँग्रेसने दोन तर राष्ट्रवादीने त्यांच्या कोटय़ातील एक जागा मित्र पक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पुढाकारातून लोकसभा व पुढे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या विरोधात भक्कम अशी महाआघाडी उभी करण्याचे प्रयत्न गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, शेकाप, माकप, भाकप, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बसप, बहुजन विकास आघाडी व रिपब्लिकन पक्षाच्या अन्य गटांना एकत्र करून महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न होते. प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या अटी घालून आघाडीत सहभागी होण्याचे टाळले. तसेच वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी महाआघाडीपासून आधीच फारकत घेतली आहे.

राज्यात बसपबरोबर युती करण्याची काँग्रेसची इच्छा होती. कारण राज्यात बसपची हक्काची मते आहेत. बसपाबरोबर आल्यास विदर्भात काही जागांवर फायदा झाला असता. परंतु उत्तर प्रदेशचाच कित्ता गिरवत राज्यात बसपने फक्त सपबरोबर युती करण्याचे जाहीर केले. समाजवादी पार्टीने एका जागेची अपेक्षा व्यक्त केली होती. सपाची मुळातच ताकद मर्यादित असल्याने कोणती जागा सोडायची यावर आघाडीतच एकमत झाले नाही. यामुळे सपानेही बसपाशी हातमिळवणी केली.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दोन जागांचा आग्रह कायम ठेवला. त्यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ सोडण्यास आघाडीने तयारी दर्शविली.

पण दुसऱ्या जागेवर ते आग्रही राहिल्याने शेवटी सांगलीची जागा सोडण्यास काँग्रेस तयार झाली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी किंवा पालघरचा आग्रह धरला होता. त्याबाबत वाटाघाटी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने तेथे आपला उमेदवार जाहीर केला. परिणामी माकपने आघाडीत सहभागी होण्याचे टाळले आहे. पालघर मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने पाठिंबा देण्यात येणार आहे.

काँग्रेस २६ तर, राष्ट्रवादी २२ जागा

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस २६ तर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला २२ जागा आल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापल्या कोटय़ातील जागा मित्र पक्षांना सोडायच्या आहेत. राष्ट्रवादीने आपल्या कोटय़ातील हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे. काँग्रेसने सांगलीची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी, असा प्रस्ताव आहे. काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत घोळ सुरू होता. पालघरची जागा काँग्रेसने हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षासाठी सोडण्यास तयारी दर्शविली आहे. याचाच अर्थ काँग्रेसच्या वाटय़ाला येणाऱ्या २६ पैकी दोन जागा मित्र पक्षांना सोडण्यात येतील. काँग्रेस पक्ष २४ जागा लढवेल. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येणाऱ्या २२ पैकी एक जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात येईल.

औरंगाबाद आणि रावरेचा वाद कायम

आघाडीत औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा म्हणून पक्षाचा आग्रह कायम आहे. या बदल्यात काँग्रेसला रावेर मतदारसंघ सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. पण काँग्रेस औरंगाबाद मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. अहमदनगरची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची करूनही राष्ट्रवादीने ती सोडण्यास नकार दिला होता.