‘श्री गणेश, रंगदेवता आणि नाटय़रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत, सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका!..’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन तरुणांच्या नाटय़गुणांना वेगळे अवकाश उपलब्ध करून देणारी आणि राज्यभरातील या ताऱ्यांना मालिका-नाटक-चित्रपट यांच्या कोंदणात बसवण्यात निर्णायक भूमिका बजावणारी ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा ’ लवकरच सुरू होणार आहे. २९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरातील आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. ‘पृथ्वी एडिफाइस’ आणि अस्तित्त्व या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी ‘झी नक्षत्र’ टेलिव्हिजन पार्टनर म्हणून लाभले आहेत. तर या स्पर्धेतील गुणवान कलाकारांची पारख करण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन्स टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज https://loksatta.com/lokankika2015/entryform/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका २०१४ या स्पर्धेने पहिल्याच वर्षी राज्यातील आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. नागपूरपासून मुंबईपर्यंत आणि रत्नागिरीपासून औरंगाबादपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या स्पर्धेत पहिल्याच वर्षी १०८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. महाअंतिम फेरीत आठही केंद्रांवरील अंतिम फेरीत सर्वोत्तम ठरलेल्या एकांकिकांमधून पुण्याच्या आएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’ महाराष्ट्राची पहिलीवहिली ‘लोकांकिका’ ठरली.यंदा ‘लोकसत्ता लोकांकिके’चे हे दुसरे वर्ष असून यंदा २९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर यांदरम्यान ही स्पर्धा राज्यभरात नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या आठ केंद्रांवर होणार आहे.
ही स्पर्धा प्राथमिक (तालीम स्वरूप), विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांत होणार असून प्राथमिक फेरी २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर यांदरम्यान पार पडेल. त्यानंतर प्रत्येक विभागातून निवडलेल्या चार ते सहा उत्तम एकांकिकांची विभागीय अंतिम फेरी ६ ते १३ ऑक्टोबर यांदरम्यान होईल. त्यानंतर प्रत्येक विभागातील सर्वोत्तम एकांकिका १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीत सादर होईल आणि त्यातून निवडली जाईल महाराष्ट्राची ‘लोकांकिका’! आता या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून प्राथमिक फेरी सुरू होण्यासाठी तब्बल दीड महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे महाविद्यालयातील नाटय़वेडय़ा तरुणांनो, चला, तयारीला लागा!