14 August 2020

News Flash

नवदुर्गाच्या कर्तृत्वाचा सन्मान

‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कार सोहळा आज रंगणार

‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कार सोहळा आज रंगणार

मुंबई : विधायक कामांसाठी झोकून देऊन आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या नऊ दुर्गाचा सन्मान सोहळा आज, २२ ऑक्टोबरला रंगणार आहे. निवृत्त पोलीस अधिकारी मीरां चड्ढा बोरवणकर यांना यंदा दुसऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्त मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

सामाजिक बदलांसाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाद्वारे गौरवण्यात येते. नवरात्रीचे नऊ दिवस या दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध करण्यात येते. या उपक्रमाचा यंदाचा सन्मान सोहळा आज सायंकाळी ६.१५ वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगणार आहे.

गेल्या वर्षीपासून ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. आपल्या कडक शिस्तीने संपूर्ण पोलीस दलात दरारा निर्माण करणाऱ्या, कर्तव्यदक्ष, करारी आणि कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करणाऱ्या अधिकारी म्हणून लौकिक असणाऱ्या निवृत्त अधिकारी मीरां चड्ढा बोरवणकर यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

वंचित मुलांसाठी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था स्थापन करून हजारो मुलांसाठी आधारवड बनलेल्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, मेळघाट येथे राहून आदिवासींच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. कविता सातव, विविध सामाजिक संस्थांना दानशूर लोकांपर्यंत पोहोचवून कोटय़वधी  रुपयांचे दान मिळवून देणाऱ्या वीणा गोखले, वाळूमाफियांना रोखणाऱ्या तडफदार तहसीलदार शिल्पा ठोकडे, लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना मानसिक वेदनेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले, समाजातील कुप्रथा, बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि जातपंचायतींच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अ‍ॅड्. रंजना गवांदे, अनेक विक्रम करणाऱ्या जलतरणपटू ‘सागरकन्या’ रुपाली रेपाळे, एचआयव्ही- एड्सग्रस्त मुलांच्या आई झालेल्या मंगलताई शहा आणि मतिमंद मुलांसाठी ‘घरकुल’ थाटणाऱ्या नंदिनी बर्वे यांना या सोहळ्यात दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. तात्याराव लहाने, रामदास भटकळ, प्रशांत दळवी, सुमीत राघवन यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या सन्मान सोहळ्यात कवी सौमित्र, मिताली विंचूरकर, मेघा राऊत, कौशिकी जोगळेकर, दसक्कर भगिनी आणि ‘संगीत देवभाबळी’ फेम मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते आदींचा सहभाग असलेली साहित्य, संगीताची बहारदार मैफलही अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल.

कार्यक्रमाचे प्रायोजक

प्रस्तुतकर्ते : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा’

सहप्रायोजक : एन के जी एस बी को-ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

पॉवर्ड बाय : व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि. पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक, इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

* कधी? – आज, २२ ऑक्टोबर, सायंकाळी ६.१५ वाजता

* कुठे? – स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:11 am

Web Title: lokasatta durga award ceremony will held today in mumbai zws 70
Next Stories
1 ‘लोकसत्ता अर्थभान’ला मुलुंडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
2 मतदानाची सक्तीच करायला हवी : नाना पाटेकर
3 मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नाही – सर्वोच्च न्यायालय
Just Now!
X