‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवाबनवी’सारख्या मराठी चित्रपटांमधून लोकप्रिय अभिनेत्री म्हणून एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या निवेदिता जोशी-सराफ या पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असणाऱ्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील ‘आसावरी’ या भूमिकेतून घराघरांत लाडक्या झाल्या आहेत. नव्वदच्या दशकात अभिनेत्री म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या निवेदिता यांनी त्यानंतर मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, रंगभूमी या तिन्ही माध्यमांवर आपला ठसा उमटवला आहे. कारकीर्दीच्या या टप्प्यावर ‘आसावरी’च्या व्यक्तिरेखेतून रसिकांची मने जिंकणाऱ्या निवेदिता यांच्याशी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमातून गप्पा रंगणार आहेत.

नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून अभिनेत्री आणि निर्माती म्हणूनही निवेदिता जोशी-सराफ या कायम वेगवेगळे प्रयोग करत आल्या आहेत. त्यांच्या या क डुगोड अनुभवांचे गाठोडे ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत, ‘पितांबरी रुचियाना’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय एम. के. घारे ज्वेलर्स ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमातून उलगडणार आहे. बुधवार, १८ डिसेंबर रोजी ठाण्यात टिप टॉप प्लाझा येथे संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

निवेदिता यांनी हिंदीत ‘सपनोंसे भरे नैना’, ‘यह जो है जिंदगी’सारख्या मालिकांमधून काम केले आहे. मराठी रंगभूमीवरही त्यांनी दर्जेदार नाटके  केली. ‘टिळक आगरकर’, ‘अखेरचा सवाल’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘हसत खेळत’ अशा विविध नाटकांमधून त्यांनी काम केले आहे. तब्बल तीस वर्षे चित्रपट-नाटक आणि मालिकांमधून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या निवेदिता यांनी या माध्यमांचा बदलता काळ अनुभवला आहे. हा बदल स्वीकारत पुढे गेलेल्या कलाकारांपैकी त्या एक आहेत.

केवळ अभिनयातच न रमता निवेदिता यांनी ‘हंसगामिनी’ नावाने स्वत:चा साडय़ांचा ब्रॅण्डही नावारूपाला आणला आहे. कारकीर्दीच्या यशाच्या शिखरावर असताना अभिनेते अशोक सराफ यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर अभिनयापासून दूर राहिलेल्या निवेदिता यांनी पुन्हा एका टप्प्यावर अभिनेत्री म्हणून जोरदार पुनरागमन केले.

निवेदिता यांचे आजवरचे अनुभव, ‘अग्गंबाई सासूबाई’च्या निमित्ताने मिळणारे चाहत्यांचे प्रेम, अभिजीत राजे आणि शुभ्राबरोबरची सेटवरची धम्माल आणि बबडय़ाचे अतिलाड करू नको म्हणून आसावरीला मोलाचा सल्ला देणाऱ्या-तिच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या चाहत्या भेटतात तेव्हा काय होतं.. अशा अनेक गोष्टींवर त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’मधून मिळणार आहे.

कुठे – टिपटॉप प्लाझा, एलबीएस रोड, चेकनाक्याजवळ, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (पश्चिम) ४००६०२.

कधी – बुधवार, १८ डिसेंबर २०१९

केव्हा – सायंकाळी ६ वाजता