News Flash

पवई तलावातील प्रदूषणाबाबत लोकायुक्तांनी अहवाल मागवला

पवई तलावातील प्रदूषणाबाबत केंद्रीय नदी संवर्धन प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय यांच्या बरोबरीनेच आता राज्याच्या लोक आयुक्तांनीही शासनाच्या पर्यावरण विभाग व मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे.

पवई तलावातील प्रदूषणाबाबत केंद्रीय नदी संवर्धन प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय यांच्या बरोबरीनेच आता राज्याच्या लोक आयुक्तांनीही शासनाच्या पर्यावरण विभाग व मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे पवई तलावात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या प्रदूषणाची विविध नियामकांनी गंभीर दखल घेतली असून याचे परिणाम प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांना व विशेषत: मुंबई महानगरपालिकेला भोगावे लागणार असल्याची चर्चा पर्यावरणवाद्यांमध्ये होत आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून जवळपास तेरा मोठय़ा वाहिन्यांमधून घरगुती सांडपाणी पवई तलावात सोडले जाते. त्याचबरोबरीने तलावात मोठय़ा प्रमाणावर गाळदेखील साठला आहे. यामुळे तलावातील जैववैविध्य धोक्यात येत असले तरी तलावात प्रदूषण सुरूच आहे. येथील मत्स्यसंपदा व मगरी यांचे अस्तित्व या प्रदूषणामुळे धोक्यात आले असून हेच पाणी आरे कॉलनीतील म्हशींना पिण्यासाठी पुरवले जाते. या पाण्यामुळे आरे कॉलनीतील म्हशींच्याही आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे प्रकारही मध्यंतरी घडले होते. इतक्या घटना होऊनही पालिका व वन खाते या प्रकरणी विशेष लक्ष देत नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. यामुळे पर्यावरणवादी पालिकेविरोधात आक्रमक झाले असून ‘पॉज’ या पर्यावरणवादी संस्थेच्या सुनीष कुंजू यांनी पालिकेविरोधात राज्याच्या लोक आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची लोक आयुक्तांनी दखल घेत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या सचिवांना व मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप येथील एस विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना नोटीस पाठवत या प्रदूषणाची कारणमीमांसा करणारा अहवाल मागवला आहे. त्यामुळे केंद्रीय नदी संवर्धन प्राधिकरण व मुंबई उच्च न्यायालयानंतर लोक आयुक्तांनी अहवाल मागवल्याने पालिकेतील तलाव व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे समजते. या तीनही अहवालांनंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. दरम्यान, पालिकेकडे गेले अनेक दिवस पाठपुरावा करूनही या प्रकरणी ठोस उपाय होत नसून आजवर झालेल्या या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी कुंजू यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:48 am

Web Title: lokayukta told to give report on powai lake pollution
Next Stories
1 ‘कॅटवुमन’च्या मदतीसाठी प्राणीसंस्था सरसावल्या
2 मुंबईतील पुलांचे सुरक्षा ऑडिट
3 सहज सफर : मुंबईतील अष्टविनायक
Just Now!
X