लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आजपासून शंभर वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
राजकारणात धर्माची ही लुडबुड कशाला, यामुळे मुसलमान समाज नाराज होईल, जातीय तेढ वाढेल, तणाव निर्माण होईल, अशी टीका त्या वेळी करण्यात आली. या टीकेला टिळकांनी १६ सप्टेंबर १८९६ रोजी पुण्याच्या रे मार्केटमध्ये झालेल्या व्याख्यानात उत्तर दिले. हे व्याख्यान २२ सप्टेंबर १८९६ च्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
श्री गजाननाच्या महोत्सवाची निंदा करणाऱ्या काही गृहस्थांनी या उत्सवावर आरोप आणले आहेत. त्यांचा विचार सर्व लोकांपुढे करण्याची अत्यंत जरूर आहे. दोन वर्षांपूर्वी प्रथम जेव्हा उत्सवास आरंभ झाला तेव्हा मुसलमानांना चीड उत्पन्न करण्याकरिता आम्ही हा उत्सव करतो, असा एक आरोप आमच्यावर होता; पण दोन वर्षांत तो आरोप आपोआप गळून पडला आहे.  
आम्हांस मुसलमानांचा द्वेष करण्यात काही हशील नाही. एका दावणीला बांधलेल्या मेंढय़ांनी आपापसात दांडगाई केल्याने काही उपयोग होत नसतो हे प्रत्येक हिंदूस समजते. मुसलमानांशी सलोखा करा. त्यांच्याशी प्रीतीने वागा, पण प्रीती दाखवायची म्हणजे गणपतीचा उत्सव सोडून द्यावयाचा असा अर्थ धरण्याचे काही प्रयोजन नाही. आपापल्या धर्माने वागून एकमेकांचा बहुमान ठेविता येतो. खुषामतगार मात्र आपला धर्म सोडून दुसऱ्याकरिता पाहिजे तो वेश आणि सोंग घेण्यास तयार असतात. मुसलमान बंधूंची खुषामत करण्याचे काही कारण नाही व हिंदूंनी आपली वृथा स्तुती करावी, अशी आमच्या विधर्मी बंधूंचीही इच्छा असणे शक्य नाही.
परकीयांचे पोकळ स्तोम माजविणाऱ्या भित्र्या स्तुतिपाठकांच्या या मताकडे जरादेखील लक्ष पुरविण्याचे कारण नाही. या उत्सवात अतोनात खर्च होतो, अशी काहींनी ओरड माजविली आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नव्हे. मानवी प्राण्याला कैद्यांच्या राहणीने रहा म्हणून सांगणे म्हणजे महामौख्र्य आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत व कोणतीही कामे पैशावाचून होत नसतात. या उत्सवात प्रत्येक जण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस उत्साहाने जर काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडकेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामथ्र्य नाही तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत; पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यक आहेत. उत्सवाच्या खर्चातून औद्योगिक कारखाने काढण्याची सूचना करण्यापेक्षा बूट, स्टॉकिंग व आकडीच्या पोषाखातील इतर नटवेपणा यांच्या आजपर्यंतच्या वायफळ खर्चातून किती गिरण्या उभारल्या गेल्या असत्या याचा विचार व्हायला पाहिजे होता. राष्ट्रीय सभेस जाण्या-येण्याच्या निमित्तच दरसाल लाखो रुपये उडत नाहीत काय? पण त्याचा उपयोग नाही असे कोण म्हणेल?
कोठे वृथा खर्च होत असल्यास तेवढीच गोष्ट लोकांच्या नजरेस आणावी. सरसकट बारा टक्के एकंदर उत्सवावर कोरडे ओढण्यात निंद्य हेतू दृष्टीस पडतो. मुलांच्या अभ्यासाचा वेळ फुकट जातो अशीही हाकाटी आहे. संध्याकाळी गणपती पाहण्याची घाई असल्यामुळे बायका भात कच्चा करितात, असा उत्सवावर जंगी आरोप अद्याप या वेडगळ मंडळींनी कसा केला नाही याचे आश्चर्य वाटते. क्रिकेट मॅचकरिता वारंवार दोन-दोन दिवस शाळा बंद ठेवलेल्या चालतात; पण गजाननाचे नाव घेण्यात मुलांचा वेळ फुकट जातो. गव्हर्नरसाहेब मॅचच्या वेळी हजर असतात; पण आमच्या उत्सवात बडा साहेब कोणी नाही. यामुळे या उत्सवावर हा पोरकट सुधारकी आक्षेप आलेला आहे. गव्हर्नरसाहेब या मंडपात येऊन बसावयास लागू देत, की लागलीच या उत्सवावर तोंड सोडणारी वर्तमानपत्रे याच उत्सवाच्या पोवाडय़ांनी भरलेली आपण पहाल. युनिव्हर्सिटीच्या निकालात पुष्कळ उमेदवार यंदा नापास होतील, अशी काहींना भीती वाटते; पण ती स्वकपोलकल्पित आहे, असे त्यांनी समजावे. परीक्षांचा निकाल बाहेर पडला की सर्व गोष्टी स्वच्छ दिसणाऱ्या आहेत. या दहा दिवसांत विद्यार्थ्यांच्या मनावर जे संस्कार होतील ते शाळेतील वर्षांच्या शिक्षणाहून अधिक किमतीचे खास आहेत. अशा उत्सवांच्या वेळीच उत्पन्न झालेल्या धर्म-बुद्धीचाच सर्व आयुष्यभर उपयोग व्हावयाचा असतो. उदात्त विचार व उग्र मनोवृत्ती याच वेळी जागृत होतात. ज्यामुळे जिवंत राहण्यात एक प्रकारचा थोरपणा आहे, त्या गोष्टी शिकण्याच्या शाळा हे उत्सव आहेत. कोणतीही गोष्ट वाईट आहे असे सिद्ध करावयाचे असल्यास त्या गोष्टीस काही तरी वाईट नाव द्यावे अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. सुधारक पंथातील मंडळींचा या उत्सवातील काही व्यक्तींशी द्वेष असल्यामुळे उत्सवात हे लोक सामील होत नाहीत. उत्सवातील त्या त्या व्यक्ती मेल्याशिवाय असल्या राष्ट्रीय महोत्सवाच्या उपयुक्ततेची खात्री सुधारक म्हणविणाऱ्यांना पटावयाची नाही. जर उत्सवात काही कमतरता असली तर त्याचे पाप या उदासीन शहाण्या मंडळींच्याच कपाळी मारावे लागते. लोकांत मिसळा, त्यांचे कोठे चुकत असल्यास सर्व गोष्टी नीट जुळवून द्या. सुशिक्षितांचा अधिकार असा आहे, त्यांची कर्तव्ये हीच आहेत.
संकलन – शेखर जोशी
(अश्वमेध प्रकाशन प्रकाशित आणि मो. ग. तपस्वी संकलित व संपादित ‘बोल अमृताचे’ या पुस्तकावरून साभार)

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर झालेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आहे.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!