राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भावना; ‘लोकरंग’मधील ‘ये है मुंबई मेरी जान’ सदर पुस्तकरूपात प्रकाशित

‘‘काही लोक आपली छाप सोडून जातात. त्यापैकी एक कुलवंतसिंग कोहली होते. प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत आलेल्या कोहली कुटुंबाने स्वत:चे स्थान निर्माण केले आणि मुंबईचा अविभाज्य भाग झाले. मुंबईत येऊन मोठे झालेले अनेक जण आहेत, मात्र कुलवंतसिंग यांनी स्वत:बरोबर अनेकांच्या स्वप्नांना बळ दिले आणि याची जाण ठेवून मुंबईकरांनीही त्यांना प्रेम दिले,’’ अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी व्यक्त केल्या. ‘लोकसत्ता’मध्ये गेले वर्षभर प्रसिद्ध झालेल्या कोहली यांच्या ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदरातील लेखसंग्रहाच्या प्रकाशनावेळी कोश्यारी बोलत होते.

या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी कोश्यारी यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, लेखक नितीन आरेकर, स्वर्गीय कुलवंतसिंग कोहली यांच्या पत्नी मोहिंदरकौर कोहली, पुत्र अमरदीपसिंग आणि गुरबक्षसिंग कोहली यांसह मुंबईतील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘कोहली आणि माझे ऋणानुबंध हे १९७६ पासून आहेत. चंदेरी दुनियेमागील वास्तव कोहली यांनी जवळून पाहिले. अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. झगमगाटापलीकडे असलेले अनेक कलाकारांचे, दिग्गजांचे आयुष्य कोहली यांनी ‘ये है मुंबई मेरी जान’च्या माध्यमातून मांडले. हे पुस्तक क्षणिक आनंदासाठी वाचण्याचे नाही, तर ते जीवनमूल्य शिकवणारे आहे. ती मूल्ये पापाजींनी (कोहली) आत्मसात केली होती. अनेकांची आयुष्ये त्यांनी उभी केली. मात्र ते कायम नम्र राहून माणसे जोडत राहिले.’’

पुस्तकाचे लेखक नितीन आरेकर यांनी साप्ताहिक सदरापासून ते पुस्तकापर्यंतचा प्रवास उलगडला. ‘‘कोहली यांच्यासारख्या दिलदार माणसाची भेट हा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव होता,’’ अशा भावना आरेकर यांनी व्यक्त केल्या.

कोहली यांच्याबरोबरील भेटीचा ‘प्रीतम योगायोग’ सांगून कुबेर म्हणाले, ‘‘माणसांना सामावून घेणारे, आपलेसे करणारे कुलवंतसिंग हे ‘भारत’ या संकल्पनेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांची भेट ही माझ्यासाठी आयुष्यातील संस्मरणीय संध्याकाळ होती.’’ डॉ. बोरसे आणि डॉ. पसरिचा यांनीही या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आठवणींना उजाळा..

रावळपिंडीहून येऊन मुंबईला आपलेसे करणारे कुलवंतसिंग कोहली हे मुंबईतील अनेक बदलांचे, अनेक दिग्गजांच्या आयुष्याचे साक्षीदार. मुंबईकरांच्या भावना आणि आठवणींचा खजिना सांभाळणाऱ्या ‘प्रीतम’ हॉटेलचे मालक असलेल्या कुलवंतसिंग कोहली यांचे अनुभव, आठवणी आणि अनेक दिग्गजांचे पडद्यामागील आयुष्य हे ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वाचकांसमोर आणले. ‘लोकरंग’ पुरवणीत २०१८ मध्ये दर आठवडय़ाला ‘ये है मुंबई मेरी जान’ हे कोहली यांचे सदर प्रसिद्ध करण्यात येत होते. प्रा. नितीन आरेकर यांनी या सदराचे शब्दांकन केले होते. या सदरातील लेख राजहंस प्रकाशनाने पुस्तकरूपाने प्रकाशित केले आहेत.