सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी असून ‘ड्राय डे’ असल्याने तळीरामांनी मद्याची बुधवारीच खरेदी केली. तर पक्ष कार्यकर्ते, समर्थकांनी घर, कार्यालय, हॉटेल आणि शेतघरांवर एकत्रित निकाल पाहण्याची तयारी केली आहे. मागणी पाहता काही हॉटेलमालकांनी या दिवशी खोल्यांचे भाडे दुप्पट केले आहे.

निकालानंतर होणारा धांगडधिंगाणा लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने ‘ड्राय डे’ जाहीर केला असून हा दुसऱ्या दिवसापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे बुधवारी मद्यालयांसमोर रांगाच रांगा लागल्या होत्या. यंदा अंतिम निकाल लागेपर्यंत पहाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागत असले तरी एक्झिट पोलमुळे निकालांचा कल पुढे आला आहे. यात एनडीए सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एनडीए सर्मथक व कार्यकत्यांत उत्साह आहे. यूपीएचे सर्मथक व कार्यकर्ते निकालाच्या दिवसापर्यंत आशेवर आहेत. एक्झिट पोलपेक्षा येणारे निकाल हे अनपेक्षित असू शकतात अशी आशा त्यांना आहे.

त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांनी एकत्रित निकाल पाहणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी मे महिन्याच्या सुट्टीत मुलाबाळांसह कुटंब गावाला गेल्याने रिकामे असलेले घराचा फायदा उठविला जाणार आहे तर काहींनी हॉटेलच्या थंडगार खोल्या भाडय़ाने घेणे सोईस्कर ठरविले आहे. त्यासाठी सर्वानी विभागून भाडे जमा केले आहे. काहींनी लोणावळा, खंडाळा, अलिबाग आणि पनवेल येथील शेतघरांना पसंती दिली आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या रेस्टॉरन्टमधील काही टेबले आरक्षित केली आहेत. देशाच्या राजकरणाची स्थिती रेस्टॉरन्टमधील टीव्हीवर एकत्र बसून पाहिली जाणार आहे. यामुळे चर्चाचे फड रंगणार आहेत. त्यासाठी काही रेस्टॉरंटनी विशेष तयारी केली असून मतदानाच्या दिवशी देण्यात आलेली सवलत मतमोजणीलादेखील दिली जाणार आहे.