काव्यानुभूती देणारा ‘लोकसत्ता’चा  ‘अभिजात’ उपक्रम शुक्रवारी ठाण्यात

मुंबई : कवितेला वय नसतं. तशी ती कधी जीर्णशीर्णही होत नाही. तिचा टवटवीतपणा कालातीत असतो. त्यामुळे कितीही वर्षांनंतर कविता पुन्हा एकदा हाती पडली, की दरवेळी नवा प्रत्यय देऊन जाते. एखादी कविता एकदा का हृदयस्थ झाली, की मग तिची आणि रसिकाची गट्टी जमते. मराठी शारदेच्या प्रांगणातील अशा कितीतरी कविता रसिकांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या असतात. काव्यसंपन्नतेचा अनुभव घेण्याची संधी येत्या २८ फेब्रुवारी रोजी ठाण्यात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात’ या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात खचितच मिळू शकेल.

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अभिजात’ या उपक्रमाचे पहिले पर्व ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी सहा वाजता सादर होणार आहे. कवितेच्या या मंचावर आपले स्वत:चे काव्य सादर करण्यासाठी नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, स्वानंद किरकिरे, प्रतीक्षा लोणकर यांच्यासारखी लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे एकत्र येणार आहेत. त्यांच्या बरोबरीनेच अशोक नायगावकर, नीरजा आणि मिलिंद जोशी हे ज्येष्ठ कवीही या मंचावर उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत.

मराठी कवितेतील मानाचे पान मिरवणाऱ्या शांताबाई शेळके यांना शब्दकळेचे वरदानच होते. तरीही आपल्या कवितेबद्दल त्या हळव्या असायच्या. त्यामुळेच

कुणास काय ठाऊके

कसे, कुठे उद्या असू

असेन मी, नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे

अशी कवितेचीच कविता त्यांच्या लेखणीतून उतरू शकते.

 

कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला..

रसिक म्हणून आपणही कवितांचे काही देणे लागतो. ते फेडण्याची संधी येत्या शुक्रवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी ठाण्यात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार आहे. ‘लोकसत्ता’चा हा ‘अभिजात’ उपक्रम संस्कृतीसंपन्न होण्यासाठीचा रंगमंच आहे. कवितांवरील प्रेमाची एक खूणच. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशमूल्य नसले, तरीही त्यासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी उपलब्ध होणार आहेत.

प्रायोजक

‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी आणि मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा हे आहेत.