‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमातंर्गत राज्याच्या अर्थकारणाबरोबरच राजकीय-सामाजिकदृष्टय़ाही अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेतला जाणार असून कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या भाषणाने उद्घाटन होईल. तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाने या परिषदेचा समारोप होईल.

सोमवार, २६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा उहापोह केला जाणार आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आपली भूमिका मांडणार आहेत. या परिषदेतील पहिले सत्र कृषी विषयावर होणार असून  शेती विकासाचा दर वाढविण्यापासून ते शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा कृषीविषयक सत्रात घेण्यात येईल. राज्याच्या कृषी

अर्थकारणासमोरील आव्हाने, शेतमालाचे दर आणि बाजारपेठ या विषयांचाही ऊहापोह या सत्रात होईल. राज्यातील कृषी विभागाची कामगिरी व पुढील दिशा यांचा आढावा कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे हे घेतील. राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषीअर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे हे मान्यवरही या सत्रात सहभागी होतील. शेतीला पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या कामांचा, राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा, पाण्याच्या वाढत्या मागणीचा ऊहापोह जलसंपदामंत्री गिरीश महाजन समारोपाच्या भाषणात करतील.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास या विषयांतील संबंधितांनी  events.loksatta@expressindia.com या ई-मेलवर नावे नोंदवावीत. निवडक इच्छुकांनाच कार्यक्रमात प्रवेश देण्यात येईल.

प्रायोजक.. : लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.