आनंद महिंद्र अध्यक्ष, महिंद्र उद्योग समूह

महिंद्र ग्रुपच्या वाटचालीत महाराष्ट्राचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोलकता हे उद्योगांचे केंद्र होते. माझ्या आजोबांनीही कोलकता येथे व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी बंगालमधून महाराष्ट्रात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भविष्याचा अदमास घेऊन त्यावेळी त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक व्यावसायिकांनी महाराष्ट्राकडे पावले वळवली. महाराष्ट्रात आल्याचा चुकूनही कधीही पश्चात्ताप झाला नाही. सध्या आमच्या दहा व्यवसायांचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. ३४ हजार कर्मचारी राज्यात कार्यरत आहेत. फक्त महाराष्ट्रातील उलाढाल २५ हजार कोटींच्या घरात आहे. महाराष्ट्राशी आमचे भावनिक नाते आहे.

जागतिक पातळीवर उंची गाठण्याची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक उद्योजकाचा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा विचार होतो, तेव्हा त्याची तुलना ही बिहार किंवा छत्तीसगढ अशा राज्यांशी होत नाही तर ती जगातील इतर देशांशी केली जाते. परंतु याचा अर्थ प्रत्येक वेळी फक्त महाराष्ट्राचाच विचार होतो किंवा होईल असे नाही. उद्योगांना इतर देश खुणावत आहेत. साधारण तीन वर्षांपूर्वी आम्ही तुर्कस्तान येथे दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. तेव्हा आमचे अधिकारी आश्चर्यचकित होऊन परत आले होते. तेथे मनुष्यबळासाठी येणारा खर्च हा भारताच्या तुलनेत खूप पटींनी कमी होता. त्यामुळे उत्पादन खर्चही कमी झाला होता. त्यानंतर आपले निर्यातक्षम उत्पादनाचे कारखाने हे भारतातील कोणत्याही शहरापेक्षा तुर्कस्तानमध्ये सुरू करण्याचा विचार आम्ही केला. परिस्थिती वेगाने बदलते आहे, आता स्पर्धा वाढली आहे हे लक्षात घेऊन वाटचाल करायला हवी.

पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, धोरणे यातून उद्योग क्षेत्रासाठी पोषक वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्षे जपले गेले आहे. याशिवाय काळानुसार बदल करणे आणि बदल स्वीकारणे हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी २५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, २० टक्के निर्यातही महाराष्ट्रातून होते. मात्र तरीही निर्मिती क्षेत्रात अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. हिमाचल आणि उत्तराखंड निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आहेत. कारण तेथे करांमध्ये आनुषंगिक सवलती देण्यात आल्या आहेत. तरीही, पुन्हा एकदा निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात उसळी घेण्याची आता महाराष्ट्राला चांगली संधी आहे.

आनंद महिंद्र यांचे रेखाचित्र देऊन स्वागत केले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याने आघाडी घेतली होती. मात्र सध्या परिस्थिती काहीशी बदलली आहे. खरेतर पुणे हे बंगळूरुला सक्षम स्पर्धक आहे. आयआयटी मुंबई असल्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल असा विचार करून अनेक कंपन्या महाराष्ट्रात आल्या. मात्र पायाभूत सुविधा, मनुष्यबळ या सगळ्यांबरोबर अजून एक घटक महत्त्वाचा ठरतो; तो जीवनावश्यक खर्चाच्या तुलनेत राहणीमानाचा दर्जा. जेथे राहण्याचा खर्च कमी असतो आणि त्या तुलनेत दर्जा चांगला असतो तेथे राहण्यास कर्मचारी प्राधान्य देतात. याबाबत आपण थोडे मागे पडलो. पुन्हा एकदा आपले स्थान बळकट करण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक क्षेत्रांचा विकास केला पाहिजे. जेथे राहणीमानाचा खर्च कमी येईल आणि दर्जा चांगला असेल असे भाग विकसित केले पाहिजेत. जेणे करून स्टार्टअप्स किंवा नव्या कंपन्या महाराष्ट्राकडे आकर्षित होतील.

सुदृढ औद्योगिक वातावरणासाठी क्लस्टर आवश्यक..

एखादा उद्योग सुरू करण्यासाठी क्षेत्राची निवड करताना औद्योगिक क्षेत्रांचा विकास, बँकिंग क्षेत्राच्या विकासामुळे भांडवलाची उपलब्धता, साक्षरतेचे चांगले प्रमाण असे अनेक घटक उद्योजकांना खुणावतात. मात्र त्यापेक्षाही औद्योगिक संकुल (क्लस्टर) किंवा औद्योगिक गावांचा विकास हा सर्वात महत्त्वाचा घटक वाटतो. एखाद्याने व्यवसाय सुरू करायचा ठरवल्यानंतर त्याला कोणतीही अडचण येऊ  नये अशा गावांची किंवा क्षेत्रांची उभारणी ही औद्योगिक विकासातील महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक स्रोतांची कमतरता असली तरी क्लस्टरच्या रचनेत त्यावर मात करता येते. पुरवठादार, उत्पादक यांची साखळी क्लस्टरच्या माध्यमातून विकसित होते. जपानचे उदाहरण लक्षात घ्यायला हवे. जपान हे एक क्लस्टर असलेले बेट आहे. क्लस्टरची संकल्पना ही औद्योगिक वातावरण सुदृढ करते. मात्र हे फक्त भौतिक सुविधांपुरते मर्यादित नाही. परिसरातील इतर उद्योग, माणसे, गुणवत्ता, साधने हे सगळे या औद्योगिक वातावरणातील घटक आहेत. अशी ठिकाणे असतात तेथे एखाद्या उद्योगाची ऊर्जा, वातावरण जाणवते. आपण जर सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलो तर आपण स्टार्टअप्सचा विचार करायला लागतो. महाराष्ट्राकडे अशा क्लस्टर निर्मितीची क्षमता आहे.

उद्योगात भरारीच्या चांगल्या संधी..

सध्या आपल्यासमोर सुवर्णसंधी उभी आहे आणि महाराष्ट्राने तर ती आवर्जून साधली पाहिजे. सध्या चीनमध्ये असलेल्या उत्पादन उद्योगातील कंपन्या पर्यायाच्या शोधात आहेत. भारताकडे या कंपन्या सक्षम पर्याय म्हणून पाहतात. अर्थात व्हिएतनामसारख्या देशांची स्पर्धा आपल्याला आहे. त्यामुळे वेगाने हालचाली करून या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करण्यात आपण पुढाकार घ्यायला हवा. ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ विकसित करून उद्योग क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी महाराष्ट्रासमोर आहे. गुजरातने आघाडी घेत विशेष आर्थिक क्षेत्रांच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्राने आता वेळ घालवू नये.

धोरणांच्या पातळीवर विचार करता मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीवर विशेष लक्ष दिले पाहिजे. चांगला मोबदला असलेला रोजगार निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील जगातील उलाढाल ही जवळपास ३७० कोटी डॉलर्सची आहे. आपली बॉलीवूडची उलाढाल ही हॉलीवूडच्या अवघी दहा टक्के आहे. भारताची या क्षेत्रातील वाढीची अफाट क्षमता आहे. मात्र, त्याकडे आपण गांभीर्याने पाहात नाही. मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक नाकारण्याचे कोणतेच कारण महाराष्ट्रासमोर नाही. उद्योग क्षेत्रातील एक प्रवाह म्हणून न पाहता स्वतंत्र, नव्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून मनोरंजन क्षेत्राच्या विकासाचा विचार व्हावा. त्यात फक्त चित्रपट क्षेत्र नाही तर इतरही अनेक घटकांचा विचार व्हावा. तिसरे महत्त्वाचे क्षेत्र विचारात घ्यायला हवे ते म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय उत्पादन निर्मिती. नैसर्गिक उत्पादनांबाबतचे आकर्षण वाढत आहे, त्याचप्रमाणे यात गुंतवणूक करण्यासही लोक उत्सुक आहेत. महाराष्ट्र या क्षेत्राचे केंद्र म्हणून विकसित होऊ  शकते.’

गतिमान कारभाराची फडणवीस शैली..

आडमार्गाने परवानगी मिळवण्याची पद्धत महिंद्रमध्ये कधीही नाही. त्यामुळेच कदाचित अनेकांच्या अपेक्षेनुसार आमची वेगाने वाढ झाली नसावी. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर एक सुखद धक्का बसला. आमची कांदिवली येथे जमीन आहे. ती पर्यटन क्षेत्रासाठी राखीव आहे. तेथे मनोरंजन नगरी उभी करण्याचा प्रकल्प आम्ही आखला. चित्रपट संग्रहालय, स्टुडिओ, रिसॉर्ट अशा अनेक गोष्टी उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून कधीही परवानगी मिळणार नाही, असे वाटत होते. प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केल्यावर त्याची फाइल मुख्यमंत्री कार्यालयाकडे असल्याचे कळले. माझा तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याशी फारसा परिचय नव्हता. ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी एका अनौपचारिक कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती इतकेच. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेटायला या असा निरोप मिळणार, असे वाटत होते. बाकी काही नाही तरी निदान मुख्यमंत्र्यांच्या समोर हजेरी लावण्याची अपेक्षा असावी, असे वाटत होते. पण लगेच काही दिवसांत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे कळले. त्यानंतर एका कबड्डी सामन्याच्यावेळी मुंबईत फडणवीस यांची भेट झाली. त्यांच्या शेजारी मी बसलो होतो. ‘आपण कधी यापूर्वी भेटलो नाही. मात्र, कोणत्याही अपेक्षेशिवाय आमच्या कंपनीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे आश्चर्य वाटले,’ असे मी त्यांना सांगितले. त्यावेळी ‘मी फक्त प्रस्तावच मंजूर केला नाही, तर पुढे काही अडचणी येऊ  नयेत, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. असा कारभार पाहून मला सुखद धक्का बसला

मिहद्र हा वटवृक्ष..

मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा कामगार संघटना, नेत्यांचे प्रस्थ होते. तेव्हा पद्मिनी मोटर्स बंद होण्याच्या मार्गावर होती. महिंद्रचेही असेच होईल, अशी भीती मला सगळ्यांनी घातली होती. त्यावेळी कर्जत येथील एक गुंड आमच्या येथील कामगार संघटनेचा नेता होता. तेव्हा कर्जतची ख्यातीही मालगाडय़ा लुटणाऱ्या टोळ्यांसाठी होती. काम सुरू केल्यावर उत्पादन वाढवण्यासाठी मी प्रयत्न केले आणि अवघ्या सहा महिन्यांत कामगारांच्या बंडाळीचा अनुभव आला. आमचे कांदिवलीचे कार्यालय कामगारांनी घेरले होते. दारे अडवून ठेवली होती, मला चार – पाच तास बाहेरही पडू दिले नाही. कामगार इतके आक्रमक होते की आता आपण काही पुन्हा भेटत नाही असेच मी पत्नीला सांगितले. त्यावेळी परिस्थिती सावरली. त्यानंतर अनेक बदल केले. सध्या व्यवस्थापन आणि कामगार संघटनांचे संबंध अतिशय उत्तम आहेत. सर्वोत्तम क्षमता असलेली, काम करणारी आमची संघटना आहे. संवाद आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थापनासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करतो. नवी पिढी खूप चांगले काम करणारी आहे.

महिंद्र उद्योगसमूहाकडे मी वटवृक्ष म्हणून पाहतो. वडाच्या फांद्यांना पारंब्या येतात, त्या जमिनीकडे जाऊन रुजतात. स्वत:चे पोषण स्वत: करू लागतात आणि त्यांचे स्वतंत्र खोड होते. परंतु ते मुख्य झाडाचाच भाग असते. तसेच महिंद्र उद्योग समूहाचा विविध क्षेत्रात विस्तार व्हावा. प्रत्येक उद्योग स्वयंपूर्ण व्हावा. वठलेल्या वडाच्या झाडाचे मूळ खोड कोणते हे जसे सांगता येत नाही तसेच महिंद्रचा सर्वात जुना किंवा मुख्य उद्योग कोणता हे सांगता येऊ  नये, इतका प्रत्येक उद्योग सक्षम व्हावा.

मोबाइल कॅमेरा असणारा प्रत्येक जण माझा एजंट

ट्विटरच्या वापराबाबत मला नेहमीच विचारले जाते. लोकांशी संवाद साधण्याचे, जोडून घेण्याचे हे एक चांगले साधन आहे. त्याचा वापर सकारात्मक आणि जबाबदारीने व्हायला हवा.

एकदा अमेरिकेत पदवी घेतलेला एक तरुण कर्मचारी माझ्याकडे आला आणि मला विचारले ‘तुम्ही ट्विटरवर नाही? तुम्ही ट्विटरवर येणार अशी चर्चा आहे आणि त्याला लोकांकडून खूप प्रतिसाद मिळतोय. अडीचशे लोक तुम्हाला फॉलो करत आहेत.’ मी म्हटलं, ‘अरे वा.. काय करतात हे?’ ‘ते वाट बघत आहेत तुम्ही ट्वीट करण्याची,’ असे त्याने सांगितले त्यानंतर काय असते हे पाहण्यासाठी ट्विटरवर आलो. मी एकाकी आहे, वेळ घालवण्यासाठी किंवा मित्रमंडळींच्या शोधासाठी ट्विटरवर वापरत नाही. व्यवसायासाठी, ग्राहकांना चांगली सेवा देता यावी. त्यांच्याशी जोडून घेता यावे यासाठी ट्विटर वापरतो.

लहान मुलांसाठीच्या उत्पादनांचा आमचा एक ब्रँड आहे. एकदा त्याच्या गुवाहाटी येथील एका दुकानात छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला वस्तू विकण्यात येत होत्या. एका ग्राहकाने त्याबाबत ट्वीट केले. मी तेथील अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी त्या दुकानावर कारवाई केली. मात्र मुंबईत बसून गुवाहाटीच्या एका दुकानात काय चाललंय हे महिंद्रना कसं कळलं असा गोंधळ अधिकाऱ्यांचा उडाला. ट्विटर हे एक चांगले साधन आहे. आमचे काय चुकते आहे, आम्ही काय सुधारणा करायला हव्यात हे ग्राहक निर्भीडपणे सांगतात. त्यादृष्टीने मोबाइल कॅमेरा असणारी प्रत्येक व्यक्ती माझी एजंट असते. एखाद्या कंपनीचा प्रमुख जर ट्विटर वापरत नाही असं सांगत असेल तर त्याला संशोधन, गुणवत्ता आणि ग्राहक यांची चाड नाही असे समजावे.

व्यवसाय ही गुंतवणूकदारांप्रति असलेली जबाबदारी..

माझ्या वडिलांची एक भूमिका होती. ते सक्रिय राजकारणात होते. १९६७ मध्ये ते अण्णासाहेब डांगे यांच्या विरोधात निवडणूकही लढले होते. तेव्हा ते ७ हजार मतांनी हरले. ते पथ्यावरच पडले असे म्हणावे लागेल. तसेही सध्याच्या राजकारणात ते टिकू शकले नसते आणि त्यांना आवडलेही नसते. तो काळ वेगळा होता. राजकारण आणि व्यवसाय हे कायम स्वतंत्र असावेत असे मला वाटते. व्यवसाय ही गुंतवणूकदारांचा विश्वास जपण्याची खूप मोठी जबाबदारी असते. तेव्हा निर्माण होणारी प्रतिमा ही त्या उद्योगसमूहाचा प्रतिनिधी अशीच असावी. पेज थ्रीवर झळकणे हे सोपे आहे. उद्या मी पोलका डॉट्स असलेले मोजे घालून फिरलो तरी पेज थ्रीचा भाग होईन. मात्र कार्यरत असेपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करावीशी वाटते अशा नामांकित समूहाचा प्रतिनिधी म्हणून जबाबदरीनेच वावरले पाहिजे. निवृत्तीनंतर स्वत:ची प्रतिमा निर्माण करावी किंवा आवडी जोपासाव्यात.

पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, धोरणे यातून उद्योग क्षेत्रासाठी पोषक वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्षे जपले गेले आहे. याशिवाय काळानुसार बदल करणे आणि बदल स्वीकारणे हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी २५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, २० टक्के निर्यातही महाराष्ट्रातून होते.

शब्दांकन : रसिका मुळ्ये