मुलुंडमध्ये २३ ऑक्टोबरला लोकसत्ता विश्लेषण

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध राजकीय घडामोडी घडत असून काही आठवडय़ांतच जगातील या महासत्तेचा प्रमुख निवडला जाणार आहे. या निवडणुकीचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील वादांचे मुद्दे व व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरू लागले आहेत. संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या या निवडणुकांतील घडामोडींचे सखोल विवेचन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर ‘लोकसत्ता विश्लेषण’ या व्याख्यानांच्या उपक्रमातून करणार आहेत.

अमेरिकेची सध्याची अध्यक्षीय निवडणूक ही अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. जगातील एका महासत्तेचा प्रमुख या निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जात असल्याने या निवडणुकीला आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणारी ही निवडणूक बहुअर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. हिलरी निवडून आल्या तर इतिहास घडेल आणि ट्रम्प निवडून आले तर इतिहासाची नोंद होईल.

देशातील महत्त्वाच्या मुद्दय़ांपेक्षाही व्यक्तिगत चिखलफेक आणि ट्रम्प यांची वारंवार बाहेर आलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि प्रकरणे यातून ही निवडणूक लक्षात राहणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी अमेरिकेत जाऊन तेथे सुरू असलेली खळबळ आणि वाहणारे आर्थिक व राजकीय वारे याचा वेध घेतला आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचकांपर्यंत या निवडणुकांचे अधिक सखोल विवेचन पोहचवण्यासाठी ‘अमेरिकन निवडणुका’ या विषयावर ‘लोकसत्ता विश्लेषण’ हा व्याख्यानांचा उपक्रम सुरू होत असून संपादक गिरीश कुबेर स्वत: विश्लेषण करणार आहेत.

कार्यक्रम कुठे, कधी

  • महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाझारच्या वर, एम. एस. संघ मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग क्रॉसिंग, मुलुंड (प.)
  • रविवार, २३ ऑक्टोबर
  • सकाळी १०.३० वाजता
  • कार्यक्रम विनामूल्य