येत्या मंगळवारी गुंतवणूकदार जागर आणि ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे प्रकाशन

यंदाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि ३६ हजारांच्या कळसाला पोहोचलेल्या ‘सेन्सेक्स’ला मोठय़ा घसरणीने घेरले. शेअर बाजारातील तेजीबाबत अनिश्चिततेची स्थिती असताना गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल काय आणि कसे असावे, याचे नेमके मार्गदर्शन ‘लोकसत्ता- अर्थब्रह्म’ गुंतवणूकदार जागरातून येत्या मंगळवारी होणार आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक कुठे आणि कशी’ हा कार्यक्रम मंगळवार, २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे होत आहे. कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर परिणाम करणारे अर्थसंकल्पातील तरतुदींचा पैलू उलगडून दाखविणारे आणि अशा स्थितीत गुंतवणुकीचे नेमके मार्ग आणि पर्याय यांचे तज्ज्ञांद्वारे दिशादर्शन या गुंतवणूकदार जागरानिमित्त होईल. याच कार्यक्रमात ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या गुंतवणूकदारांना मार्गदर्शक पाचव्या वार्षिक अंकाचे प्रकाशनही होणार आहे. या उपक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, एम. के. घारे ज्वेलर्स आणि एलआयसी असे असून, बँकिंग पार्टनर एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक आणि हेल्थ पार्टनर एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल हे आहेत.

लोकसत्ता- अर्थवृत्तान्तचे नियमित स्तंभलेखक आणि भांडवली बाजार अभ्यासक अजय वाळिंबे, सनदी लेखाकार प्रशांत चौबळ आणि कर सल्लागार प्रवीण देशपांडे हे कार्यक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. उपस्थितांना आपल्या मनांतील प्रश्न आणि शंका या तज्ज्ञ वक्त्यांना विचारण्याची संधी मिळेल. कार्यक्रम विनामूल्य आणि प्रवेश सर्वाना खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. काही जागा मात्र निमंत्रितांकरिता राखीव असतील.

यंदाच्या अर्थसंकल्पातून व्यक्तिगत प्राप्तिकराच्या रचनेत कोणताही बदल नसला तरी, समभाग गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करवसुली पुन्हा सुरू करण्याचे अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केले आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडाच्या लाभांशावरही कर सुचविला गेला आहे. यामुळे या गुंतवणुकीच्या धोरणात काही बदल करणे आवश्यक आहे काय आणि पर्याय कोणते याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन उद्बोधक ठरेल.