बुधवारी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे प्रकाशन आणि गुंतवणूक संवाद

एकंदर अर्थनिरूत्साही वातावरणाचे पडसाद भांडवली बाजारात उमटत असून, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांमध्ये कमालीची अस्थिरता अनुभवली जात आहे. अशा वातावरणात सर्वसामान्यांना छोटय़ा गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ त्यांच्या  बचतीतून खरेच मिळविता येणे शक्य आहे काय? येत्या बुधवारी ठाण्यात होत असलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’  या वार्षिक अंकांच्या प्रकाशनानिमित्त होत असलेल्या गुंतवणूकदार संवादांतून या प्रश्नाचे उत्तर मिळविता येईल.

‘बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकदार जागराचा उपक्रम बुधवार, २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता टिप टॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे  येथे होत आहे. एलआयसी, बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि मिरॅडोर रिअ‍ॅल्टी हे उपक्रमाचे पॉवर्ड बाय सहयोगी आहेत.

गेल्या वर्षभरात स्थिरावलेला महागाई दर, व्याजदरात झालेली ताजी कपात या गोष्टी गुंतवणूक जगतासाठी सकारात्मक ठरल्या आहेत. यंदाच्या  हंगामी अर्थसंकल्पाने पगारदार वर्गाच्या हाती महिन्याकाठी काहीशी  शिल्लक राहील असा कर दिलासा दिला आहे. या गोष्टींचे अर्थव्यवस्थेसाठी लाभ बरोबरीनेच आपल्या गुंतवणुकीवरील सुपरिणाम यांची उकल ही ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकातून गेली सहा वर्षे केली जाते.

शिवाय अशा समयी मग महिन्याकाठी बचत होणारा पैसा नेमका कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवावा, या सर्वसामान्यांपुढील कोडय़ाला उत्तर म्हणून हा मार्गदर्शनपर संवादाचा उपक्रमही उपयुक्त ठरत आला आहे.

शेअर बाजारातील गेल्या वर्ष-दीड वर्षांतील अनिश्चितता नेमकी कशी आहे. म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक करून, बाजार अनिश्चिततेला मात देता येईल कायर्, याचा ऊहापोह ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे या कार्यक्रमात करतील. दुसरीकडे  खर्च आणि मिळकतीची तोंडमिळवणी करणाऱ्या पगारदारांसाठी गुंतवणूक हा भविष्याबाबत मनाशी पक्के केलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा एक मार्ग आहे. गुंतवणुकीच्या सुयोग्य पर्यायांची मांडणी करून त्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा आराखडा अर्थ सल्लागार प्रशांत चौबळ  हे मांडतील.

या कार्यक्रमासाठी सर्वाना प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे. मात्र आसनक्षमता पाहता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाईल. उपस्थितांना आपले प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारून त्यांचे निराकरण करता येईल.

कधी?

बुधवार, २७ फेब्रुवारी २०१९

सायंकाळी ६.०० वा.

टीप टॉप प्लाझा, एलबीएस  मार्ग, तीन हात नाका, ठाणे (प.)

* करावे अर्थनियोजन :  प्रशांत चौबळ

* म्युच्युअल फंड आणि शेअर  गुंतवणुकीचा मेळ : अजय वाळिंबे

प्रवेश विनामूल्य व खुला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य