‘लोकसत्ता अर्थसल्ला’ शनिवारी बोरिवलीत; विविध पर्यायांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती व कोणत्या पर्यायातील गुंतवणुकीत रस घ्यावा याबाबतचा अचूक सल्ला ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या व्यासपीठावरून तज्ज्ञ देणार आहेत.

‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम शनिवार, २७ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता होत आहे. ‘टीजेएसबी बँक’ बँकिंग पार्टनर असलेला हा कार्यक्रम सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे.

संथ अर्थव्यवस्थेचे चित्र कायम असताना गुंतवणूक करावी किंवा थोडासा धीर धरावा काय? भांडवली बाजार, स्थिर उत्पन्न देणाऱ्या बचत योजना किंवा जोखीमयुक्त स्थावर मालमत्ता तसेच मौल्यवान धातू आदींपैकी कोणत्या पर्यायाची निवड करावी, याबाबतचा अचूक सल्ला या मंचावरून दिला जाणार आहे.

गुंतवणूक मार्गदर्शन पर्वातील हे तिसरे पुष्प पश्चिम उपनगरीयांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल. यापूर्वीच्या ‘लोकसत्ता’ उपक्रमाचा लाभ दादर तसेच ठाणेकरांनी घेतला आहे.

‘शेअरमधील गुंतवणुकीची योग्य वेळ’ ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे हे यानिमित्ताने सांगतील. भांडवली बाजारातील व्यवहार, कंपन्यांचे समभाग-त्यांचे मूल्य याकडे परताव्याबाबत कोणत्या नजरेने पाहावे हेही ते नमूद करतील. तर सनदी लेखाकार तृप्ती राणे या ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे आर्थिक नियोजन करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे स्पष्ट करतील. वयाच्या कोणत्या टप्प्यात व किती प्रमाणात गुंतवणूक, बचत निश्चित करून भविष्यातील तरतुदीचे ध्येय गाठता येईल, हेही त्या सांगतील.

‘लोकसत्ता’च्या या गुंतवणूक मार्गदर्शन उपक्रमाद्वारे श्रोत्यांनाही त्यांच्या गुंतवणुकीविषयीच्या शंकांचे वक्त्यांना प्रश्न विचारून निरसन करता येईल. तज्ज्ञ या प्रश्नांना सोदाहरणाद्वारे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. कार्यक्रमासाठी निमंत्रितांकरिता काही जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत.

  • कधी : शनिवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता
  • कुठे : सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (पश्चिम).