‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमात आज पनवेलकरांशी संवाद

शेअर  बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने ३२,००० चा कळस सर केला आहे. शेअर बाजारातील ही विक्रमी तेजी अनेकांना भुरळ घालणारी आहे.  बाजार चढा असणे हे गुंतवणूकदारांना सुखावणारे असले तरी त्यांची ही उंची नव्याने गुंतवणुकीसाठी मोठी जोखीमही ठरेल. उत्साह आणि भीती यात हेलकावे घेणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मनातील संभ्रमाचे निवारण पनवेलमध्ये आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाद्वारे तज्ज्ञ सल्लागारांकडून केले जाणार आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाचे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे सत्र  रविवारी, १६ जुलै २०१७ रोजी सकाळी १०.४५ वाजता वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह, तहसीलदार कार्यालयासमोर, जुने पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था कलाटणी घेत नव्या कक्षेत प्रवेश करीत आहे. भांडवली बाजारातील उत्साही वातावरण याचा पूर्वसंकेत देत आहे. अर्थव्यवस्थेत दिसणाऱ्या उभारीतून सर्वसामान्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशाचे भवितव्य बदलणेही स्वाभाविक आहे. आपल्या पैशाची भविष्यात वृद्धी होईल तर ती कशी या सर्वसामान्यांना पुढे असणाऱ्या प्रश्नाचे समाधान तसेच बदलत्या आर्थिक परिमाणांतून कुटुंबाचे अर्थनियोजन आणि गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

शेअर बाजारातील सध्याच्या तेजीकडे गुंतवणूकदार आशेने पाहत असले, तरी बाजाराच्या या उंचीची अनेकांच्या मनात भीती असणेही स्वाभाविक आहे. परंतु म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक करून, बाजाराच्या तेजीचा लाभ मिळविता येतो.  सध्याच्या काळात जोखीम टाळून निर्धास्तता मिळविता येणाऱ्या ‘म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणुकी’च्या पर्यायांचा ऊहापोह ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी या कार्यक्रमात करतील. दुसरीकडे गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग पूर्वीसारखे आकर्षक राहिलेले नाहीत. बँकांच्या मुदत ठेवी आणि अल्पबचत योजनांच्या लाभाला उतरती कळा लागली आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीच्या सुयोग्य पर्यायांची मांडणी करून त्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा आराखडा सनदी लेखाकार प्रशांत चौबळ हे मांडतील.

कार्यक्रमाला उपस्थित गुंतवणूकदारांना त्यांच्या मनांतील प्रश्न थेट तज्ज्ञ वक्त्यांना विचारून त्याचे समाधान करून घेता येईल. कार्यक्रमाला प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य आहे. तथापि सभागृहाच्या आसनक्षमतेनुरूप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

untitled-13