भांडवली बाजारातील चढ-उतार, म्युच्युअल फंड-बिगर बँकिंग वित्त संस्थांमधील अस्वस्थ हालचाल, सोने तसेच घर गुंतवणुकीतील परताव्याचा स्थिर प्रवास असे सारे अर्थचित्र असताना नव्या परिपूर्ण अर्थसंकल्पानुसार सुयोग्य आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतचे मार्गदर्शन गुरुवारी खास ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.

भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी विक्रमाला गवसणी घातली असतानाच म्युच्युअल फंड, बिगर बँकिंग तसेच गृह वित्त कंपन्यांमधील घडामोडींनी गुंतवणूकदारांमध्ये धडकी भरली आहे. अशा स्थितीत चालू आर्थिक वर्षांचा परिपूर्ण अर्थसंकल्प येत्या महिन्यात सादर होत आहे. त्याकडे आर्थिक नियोजनाच्या अंगाने बघण्याचा दृष्टिकोन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या उपक्रमातून मिळणार आहे.

म्युच्युअल फंडविषयक जनजागृती व प्रसार करणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही आहे’ प्रस्तुत आणि आघाडीची रोखे भांडार संस्था ‘सीडीएसएल’ सहप्रायोजक असलेला हा कार्यक्रम १३ जून २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजता, ठाणे महानगरपालिकेत कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात योजण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठीच आयोजित या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. या प्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

‘म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणुकी’च्या विविध पर्यायांची ओळख, त्यांची माहिती व स्वरूप आदी ‘अ‍ॅम्फी’चे संदीप वाळुंज स्पष्ट करतील. तर डीमॅटच्या फायद्यांबाबत ‘सीडीएसएल’च्या गुंतवणूकदार साक्षरता विभागाचे निवृत्त प्रमुख चंद्रशेखर ठाकूर हे मार्गदर्शन करतील.

कार्यक्रमाला प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असून, सभागृहाच्या आसनक्षमतेनुरूप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

कधी?

गुरुवार, १३ जून २०१९

दुपारी ३.३० वा.

कुठे?

कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका, ठाणे

तज्ज्ञ मार्गदर्शक :

संदीप वाळुंज (अ‍ॅम्फी)

चंद्रशेखर ठाकूर (सीडीएसएल)

प्रवेश विनामूल्य व खुला

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य