घाटकोपर येथे रविवारी ‘लोकसत्ता अर्थभान’मध्ये मार्गदर्शन

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास काही दिवसांचाच कालावधी असताना त्यात अपेक्षित प्राप्तिकर वजावटीच्या मर्यादेच्या अनुषंगाने आपल्या वित्तीय नियोजनात काय बदल करावेत? कधी प्रचंड तेजी तर कधी मोठी आपटी अशा दोलायमान स्थितीतील भांडवली बाजारात आगामी गुंतवणुकीचे धोरण काय असावे? अशा गुंतवणूकविषयक अशा प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर मिळणार आहेत. रविवारी घाटकोपर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात अर्थसाक्षरतेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात येणार आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ हा कार्यक्रम श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज ऑडिटोरियम (एसएनडीटी), कामा गल्ली, घाटकोपर (पश्चिम) येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. निमंत्रितांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांना बचतीविषयीच्या शंकांचे निरसन उपस्थित तज्ज्ञांना प्रश्न विचारून करून घेण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक नियोजनकार तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ सविस्तर भाष्य करतील.

गुंतवणुकीचे विविध पारंपरिक पर्याय तसेच विविध वयोगटातील गुंतवणुकीचे नियोजन आदींबाबत सनदी लेखापाल तृप्ती राणे  ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर सोने, स्थावर मालमत्ता या काहीशा जोखमीच्या आणि गेल्या काही व्यवहारांमध्ये परताव्याबाबत अपेक्षित प्रतिसाद न देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांबाबतची नेमकी दिशाही त्या स्पष्ट करतील. तर पसंतीच्या समभाग आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यावेत हे आर्थिक नियोजनकार सुयोग काळे ‘इक्विटी आणि म्युच्युअल फंड’ या विषयाच्या माध्यमातून सविस्तर सांगतील.

फंड आणि समभाग यांचा परस्पर संबंध, त्यांचे मूल्य, त्यातील परतावा, त्यावरील करमात्रा या मुद्दय़ांवरही यावेळी सविस्तर चर्चा होईल.

वक्ते

तृप्ती राणे :

अर्थनियोजनाचा श्रीगणेशा

सुयोग काळे : इक्विटी आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक

कधी?

रविवार २३ डिसेंबर २०१८, सकाळी १०.३० वाजता

कुठे?

श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज ऑडिटोरियम (एसएनडीटी), कामा गल्ली, घाटकोपर (पश्चिम)