मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’

पगारदारांसाठी वेतन आणि भत्तेवाढ ही आनंदाचीच बातमी असते, परंतु वाढलेल्या वेतनाबरोबर कापल्या जाणाऱ्या कराच्या वाढलेल्या मात्रेने या आनंदावर विरजणही पडते. कुटुंबाचा नित्य जमा-खर्च आणि जीवनातील ठरविलेली मोठी आर्थिक उद्दिष्टे आणि स्वप्नांची पूर्ती करीत, करबचतही गुंतवणुकीच्या माध्यमातून साध्य करता येते. याचेच मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकविषयक जागरातून केले जाईल.

राज्याच्या प्रशासनाचा डोलारा हाकणाऱ्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी, ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता या विशेष ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ अशी जागृती मोहीम चालविणारी देशातील म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘अ‍ॅम्फी’ आणि ‘सीडीएसएल’ हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

मंत्रालयात तळमजल्यावरील त्रिमूर्ती प्रांगणात होत असलेल्या या कार्यक्रमात, ‘अ‍ॅम्फी’चे पदाधिकारी आणि रिलायन्स म्युच्युअल फंडाचे विपणनप्रमुख संदीप वाळुंज हे महागाईला मात देत परतावा आणि करकार्यक्षमतेच्या दृष्टीने ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मर्म’ विशद करतील. मुलांचे उच्च-शिक्षण, लग्न, मोठे घर-गाडी ते निवृत्तीपश्चात निर्धास्त आयुष्य अशा संपूर्ण जीवनाच्या आर्थिक नियोजन हे गुंतवणुकीच्या माध्यमातून साधण्याचे कानमंत्रही ते या निमित्ताने देतील. देशाच्या वित्त बाजारात ‘डीमॅट’ प्रक्रिया जन्माला घालून नव्या युगाला साजेसा वेगवान बदल घडवून आणणाऱ्या ‘सीडीएसएल’ या संस्थेचे आर्थिक साक्षरता विभागप्रमुख अजित मंजुरे हेही याप्रसंगी दृकश्राव्य सादरीकरण करतील.  हा कार्यक्रम केवळ मंत्रालयात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच असून, दोन्ही तज्ज्ञ वक्त्यांना प्रश्न विचारून शंकानिरसनाची संधी उपस्थितांना दिली जाईल. मावळत्या वर्षांला निरोप देत असताना, मनात बाळगलेली स्वप्न आणि आर्थिक उमेद पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे या गुंतवणूकपर मार्गदर्शन नवीन आस जागविणारे निश्चितच असेल.