पाल्र्यात ६ जुलै रोजी विशेष कार्यक्रमात तज्ज्ञांशी संवादाची गुंतवणूकदारांना संधी

आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग कुटुंबाच्या आर्थिक नियोजनातून जातो. महिन्याकाठी जमा-खर्चाची तोंडमिळवणी करून, शिल्लक राहणारी बचत थोडीथोडकी असली तरी मोठय़ा कालावधीत त्यातून ठरलेली उद्दिष्टे साकारणारी संपत्ती निर्माण करता येते. मात्र त्यासाठी पैशाला चांगल्या गुंतवणुकीचे वळण दिले पाहिजे. या चांगल्या गुंतवणुकीच्या, चांगल्या सल्ल्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाला येत्या बुधवारपासून पुन्हा सुरुवात होत आहे. ६ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ, तिसरा मजला, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे हा कार्यक्रम होईल.अनेक नामवंतांचा सहभाग यात आहे.

‘आर्थिक नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर गुंतवणूक सल्लागार मिलिंद अंध्रुटकर, तर ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर अर्थनियोजनकार तेजस्विता चौधरी मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमातून उपस्थितांना आपले नेमके प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारण्याची संधीही मिळेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे. मात्र सभागृहाची मर्यादित आसनक्षमता पाहता, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाईल.

  • ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम येत्या ६ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ, तिसरा मजला, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होत आहे.
  • सर्वसामान्य मराठी पगारदारांना पैसा सुरक्षितपणे कुठे गुंतवावा, गुंतवणुकीचा निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी आणि पैशाने पैसा वाढवत नेत ठरविलेल्या उद्दिष्टांना कसे गाठावे, यावर सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून दिले जाणारे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
  • या कार्यक्रमात गुंतवणूकदार तज्ज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात.