‘बदलता महाराष्ट्र’च्या नव्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पर्यावरणाचे बिघडणारे संतुलन सांभाळायचे तर मुळात निसर्गाच्या चक्रासह अनेक गोष्टी समजावून घ्याव्या लागतात, अभ्यासाव्या लागतात. पण, हा अभ्यास, विचार तेव्हाच शक्य असतो जेव्हा पर्यावरणाच्या या असमतोलाला एक व्यक्ती म्हणून आपणही कशा प्रकारे जबाबदार आहोत, याची जाणीव आपल्याला होते. आपल्या काही कृतींमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे हे लक्षात आल्यानंतर मग ते टाळण्यासाठी म्हणून आपल्याकडून सुरू झालेला विचार, मग आपले शेजारी, समाज असे करत करत हळूहळू समष्टीपर्यंत पोहोचतो. हे सूत्र विचारात घेऊन ‘आपण आणि पर्यावरण’ अशी नवी ओळख करून देणाऱ्या चर्चासत्राला ‘बदलता महाराष्ट्र’च्या नव्या पर्वात अभ्यासपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या पर्यावरण जागराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कफ परेड येथील ‘विवान्ता बाय ताज’ येथे ‘आपण आणि पर्यावरण’ या विषयावरच्या परिषदेचा सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला. सर्वसामान्यपणे पर्यावरणाचा विचार करताना पाण्याचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण अशा कित्येक ऐकीव-वाचिक गोष्टी आपल्या मनात गर्दी करतात. या आपल्याच मनातील चौकटींना छेद देत नव्याने काही गोष्टींचा विचार करायला हवा, असा पवित्रा या परिषदेत सहभागी झालेल्या विचारवंतांनी पहिल्याच सत्रापासून घेतल्याने काहीशा अभ्यासपूर्ण आणि तरीही हलक्याफुलक्या वातावरणात सुरू झालेल्या कार्यक्रमाने पहिल्यापासूनच उपस्थितांचा ठाव घेतला.
‘जंगलाची कथा आणि व्यथा’ या पहिल्याच परिसंवादाने परिषदेची सुरुवात झाली. खारफुटीचे किंवा तिवरांचे जंगल आणि शहरातील जंगल यांचा स्वतंत्रपणेच विचार व्हायला हवा, हेच आपण विसरून जातो. तिवरांची, खारफुटींची जंगले नष्ट झाल्याने जमीन खचते आहे, समुद्राचे पाणी आत घुसते, असे अनेक गैरसमज आज प्रचलित आहे. पर्यावरणाविषयी अगदी साधे बोलायचे झाले तरी त्याची सुरुवात ही या तिवरांच्या विषयाने होते. मात्र, तिवरांची झाडे हा विषय महत्त्वाचा असला तरी त्यांच्यामुळे जमीन नष्ट होते, हा गैरसमज पहिल्या सत्रात सहभागी झालेल्या खारफुटी आणि शहरी जंगलांचे अभ्यासक विवेक कुळकर्णी यांनी अवघ्या काही मिनिटांत मोडून काढला. तर जंगलांचा विचार करताना प्राण्यांची शिकार आणि वन्यजमिनीवर होणारी अतिक्रमणे हा विषय पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याची स्वानुभवाने आणि अभ्यासाने केलेली वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांची मांडणीही उपस्थितांना धक्का देऊन गेली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अभ्यासकांनी मांडलेल्या मुद्दय़ांवर मंत्री म्हणून उत्तर देताना पर्यावरणाबद्दल आपल्यावर लहानपणापासून होणारे संस्कार, आपल्या प्रथा आणि त्याच्या अतिरेकी आग्रहामुळे पर्यावरणाचा ऱ्हास या सगळ्याचा आढावा घेत सरकारी पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पहिलेच सत्र दमदार झाल्यामुळे दुपारची दोन्ही सत्रेही त्यांच्या विषयातील नावीन्याबरोबरच प्रभावी मांडणीमुळे रंगली. ‘पाणी नेमके कुठे मुरतेय.’ या विषयावरच्या परिसंवादात अविनाश कुबल, सचिन वझलवार आणि डॉ. प्रसन्न पाटील यांनी सहभाग घेतला. तर वन्य प्राणितज्ज्ञ डॉ. विनया जंगले, समाजवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डॉ. कामाक्षी भाटे आणि पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी पर्यावरणीय असंतुलनात आपला नेमका सहभाग कसा असतो हे समजावून सांगितले.
कार्यक्रमाला पर्यावरण क्षेत्राविषयी आस्था आणि अभ्यास असलेली अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.