बदलत्या महाराष्ट्रातील महिलांच्या स्थितीवर आजपासून विचारमंथन
अनेक शतके चूल आणि मूल यात अडकलेल्या स्त्रिया अवकाशात भरारी घेण्याची स्वप्ने पाहताहेत. ते सत्यात आणताना मात्र अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. अशा अनेक अडथळ्यांवर मात करत स्वत:चे स्वप्न वास्तवात उतरवलेल्या आणि आता कर्ती आणि करवितीच्या भूमिकेत समाजाला प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांची मांदियाळी लोकसत्ता आयोजित ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ या परिषदेत जमणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन अभिनेत्री व निर्माती मुक्ता बर्वे हिच्या हस्ते होत असून समारोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाने होईल.
समाज बदलतोय, मात्र हा बदलाचा वेग कूर्मगतीचा आहे. समाजातील अनेकजणी या कूर्मगतीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत तर काहींनी या स्थितीवर मात करीत काळ, काम, वेगाचे गणित स्वत:पुरते बदलले आहे. अर्थात हा बदल काही एका दिवसात घडलेला नाही किंवा सहजसोपाही नव्हता. त्यामुळे हा बदल कसा घडला आणि घडवला याच्या कथा रंजक आणि प्रेरणादायी ठरतात. या कथा खुद्द या स्त्रियांकडूनच ऐकायला मिळतील त्या बदलता महाराष्ट्रच्या व्यासपीठावर. वैयक्तिक प्रवासासोबतच धर्म, राजकारण, सामाजिक स्थिती, करिअरच्या नवीन वाटा, प्रशासकीय स्थान अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होईल. आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च उंची गाठलेल्या स्त्रिया या चर्चेत सहभागी होत आहेत.
पूर्वीपेक्षा महिलांची स्थिती सुधारली असली तरी या सुधारणांचा वेग अजूनही कमी आहे. ‘बदलता महाराष्ट्र’ यासारख्या उपक्रमातून या स्थितीबाबत विचारमंथन होते. लोकसत्तासारखे माध्यम याबाबत लोकांना विचार करायला लावेल. त्यामुळे समाज व सरकापर्यंत महिलांची आजची स्थिती पोहोचून या प्रगतीला वेग येईल, असे टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या संचालिका अनुराधा आपटे म्हणाल्या.
केवळ स्त्री-पुरुष समानता एवढाच आवाका न ठेवता स्त्रीत्वाच्या कक्षा रुंदाविणाऱ्या आधुनिक विश्वात आपण नेमक्या कुठे आहोत व कुठे जाण्याची गरज आहे याचा उहापोह या परिषदेत केला जाईल. शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा, नागरिकीकरण, पर्यावरण अशा अनेक विषयांवर याआधीच्या ‘बदलता महाराष्ट्र’ परिषदांमध्ये प्रकाश टाकण्यात आला होता. त्यापुढे एक पाऊल पुढे जात जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर स्त्री विश्वाच्या नानाविध पलूंचे दर्शन यावेळी ‘बदलता महाराष्ट्र’मध्ये घडेल.

Untitled-21