सर्वपक्षीय महिला आमदारांचे मत,‘महिलांच्या स्पर्शाने भ्रष्ट होतो, तो देव कसा?’
‘महिलांच्या स्पर्शाने भ्रष्ट होतो, तो देव कसा,’ असा सवाल करीत काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांनी ‘शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरात महिलांच्या प्रवेशावरून झालेला वाद हा प्रतीकात्मक मानून त्याविरोधात महिलांनी आवाज उठवायला हवा होता,’ असे मत व्यक्त केले. महिला आरक्षण आवश्यकच असून स्वबळावर अधिकाधिक महिला राजकारणात आल्या, तर देश व लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास ‘लोकसत्ता’ आयोजित ‘पक्षीय भेदापलीकडची ती’ विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. देशहिताच्या मुद्दय़ांवर तरी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे, हे सर्वानीच अधोरेखित केले.

आरक्षणामुळे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळत असले तरी ते कोणाची तरी बहीण, पत्नी, मुलगी म्हणून असता कामा नये. तर ते महिलांच्या स्वबळावर असले पाहिजे व त्यांनी काही तरी करून दाखविण्याची जिद्द दाखविली पाहिजे.
– मेधा कुलकर्णी, आमदार, भाजप

सर्वसामान्य कुटुंबांमधील महिलांनी राजकारणात यावे, असे सांगितले जाते. पण त्यांना राजकीय पक्षांचे तिकीट मिळणे आणि त्यानंतर निवडून येणे, ही अतिशय कठीण गोष्ट आहे. निवडणुका हा पैशांचा खेळ झाला आहे.
– विद्या चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

पक्षीय भूमिकांमुळे काही वेळा महिलांनी एकत्र येण्यात अडथळे उभे राहतात. पण महिलांनी कोणत्याही परिस्थितीत अत्याचार सहन करता कामा नये. छेडछाड, टोमणे मारणे, विनयभंग असा छळ महिलांनी सहन न करता गुन्हे नोंदवावेत. राजकीय सत्ता कोणाचीही असली तरी महिलाच देशात बदल घडवतील.
– प्रणीती शिंदे, आमदार, काँग्रेस