‘वेगळ्या वाटेवरचे काटे’ सत्रामध्ये तज्ज्ञांचे स्पष्टीकरण , ‘सामुदायिक प्रक्रियेतून काम केल्यानंतर बदल घडतात’
वेगळ्या वाटेवर काटे नसतात तर ते पारंपरिक विचारसरणीत जखडलेल्या कुटुंब, समाजामुळे तयार होतात. ते बाजूला करण्यासाठी पुरोगामी भूमिकेची मदत घ्यावी, असा सूर ‘वेगळ्या वाटेवरचे काटे’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. या परिसंवादात जाहिरात क्षेत्रातील प्रीती नायर, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील संशोधक शुभा टोळे, ‘राइट टू पी’ आंदोलनाच्या समन्वयक सुप्रिया सोनार आणि भांडवली बाजार विश्लेषक पूर्णिमा शिरीषकर सहभागी झाल्या होत्या.
स्त्री-पुरुषांच्या समानतेचे दावे पोकळ ठरताहेत. मोफत, स्वच्छ शौचालये ही केवळ महिलांची गरज नाही, तर ते संपूर्ण समाजासाठी अत्यावश्यक आहे. महिलांसाठी शौचालये उपलब्ध व्हावीत यासाठी २०११ मध्ये ‘राइट टू पी’ मोहीम सुरू केली. आता या मोहिमेला चळवळीचे स्वरूप आले आहे. सामुदायिक प्रक्रियेतून काम केल्यानंतर बदल घडतात. त्यासाठी प्रक्रिया घेऊन पुढे जायचे आहे. पण केवळ चळवळ उभी करून हा प्रश्न सुटणार नाही.
– सुप्रिया सोनार

प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हायला हवे. महिलांनी उद्योग विश्वाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करायला हवी. एकत्र येऊन उद्योग पुढे कसा घेऊन जाता येईल याचा विचार करायला हवा. पण मराठी महिला केवळ पापड आणि लोणच्याच्या उद्योगापलीकडे जातच नाहीत. ‘झेप उद्योगिनी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिलांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दूरचित्रवाहिन्यांवर विविध मालिका पाहण्याऐवजी शेअर बाजारविषयक कार्यक्रम पाहायला हवेत.
– पूर्णिमा शिरीषकर

स्त्री-पुरुष मुळात भेद नसून ते सर्वच आघाडय़ांवर समसमान आहेत. स्त्रीला दुर्बल समजणे चुकीचेच आहे. जे मिळणार नाही, त्याची अपेक्षा करायची नाही, असे लहानपणापासून मुलीच्या मनावर बिंबविले जाते. उलटपक्षी मुलींनी लहानपणापासूनच स्वप्न पाहायला हवे आणि ते पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवायला हवे. आव्हाने तुमच्या भोवती असतातच. मात्र तुमची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी.
– शुभा टोळे

जाहिरात क्षेत्रात उशिरापर्यंत काम करावे लागते म्हणून काही महिला हे क्षेत्रच सोडतात. तर काही महिला लग्नानंतर चूल आणि मूल यातच अडकतात. त्यामुळेच या क्षेत्रात वरिष्ठ पदावर पुरुषांची संख्या अधिक आहे. येथे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आक्रमक व्हावे लागते . आक्रमक झाल्याशिवाय काहीच मिळविता येत नाही. महिलांना जाहिरातींमध्ये एक वस्तू म्हणूनच वापरले जात होते. पण आता बदल होत आहेत.
– प्रीती नायर

टीजेएसबी सहकारी बँक लि. प्रस्तुत लोकसत्ता बदलता महाराष्ट्र, सहप्रायोजक एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लि., टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’.