News Flash

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये ‘स्टार्टअप’ पर्वाचा वेध..

नवउद्योगांना दिशा दाखविणारा परिसंवाद

नवउद्योगांना दिशा दाखविणारा परिसंवाद

या वर्षांची सुरुवात ‘स्टार्टअप इंडिया’च्या घोषणेने झाली असली तरी नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांच्या दुप्पट नवउद्योग बंदही पडले आहेत. निधीचा अभाव, सरकारी यंत्रणेतील दोष, चुकीच्या कल्पना अशी एक ना अनेक कारणे त्यामागे आहेत. याच कारणांचा वेध घेत नवउद्यमींना दिशा दाखविणारा ‘पर्व स्टार्टअपचे..’ हा परिसंवाद ‘लोकसत्ता’ने ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत येत्या २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे.

हा परिसंवाद ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड’ यांच्या सहकार्याने होत असून कार्यक्रम पॉवर्डबाय केसरी आहे. या कार्यक्रमाला व्हिडीओ पार्टनर म्हणून ‘झी २४ तास’ वाहिनीची साथ लाभली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या दोन योजनांची घोषणा करून देशाच्या उद्योगाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. २०१६ची सुरुवात ‘स्टार्टअप’च्या घोषणेने झाली तेव्हापासून देशात ‘स्टार्टअप’बद्दल उलटसुलट चर्चा रंगू लागली. मात्र बरेच नवउद्योग बंद पडत असल्याने चिंतेचा सूरही उमटू लागला. या पाश्र्वभूमीवर हा परिसंवाद महत्त्वाचा ठरणारा आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी मानली जाते. कारण अपयश हे खूप काही शिकवून जाते. याच चुका सुधारून पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचलेली मंडळी चुका कशा टाळता येतील याबाबत सांगणार आहेत. तर ‘स्टार्टअप’ उभारून त्याचे मोठय़ा उद्योगात रुपांतर करण्यात यश मिळालेले यशस्वी उद्योजक त्यांच्या यशाचे गमक उलगडणार आहेत. याशिवाय ‘स्टार्टअप’च्या उभारणीत सरकारी यंत्रणांची भूमिका योग्य आहे की अयोग्य, त्यात काय उणीवा आहेत आदी मुद्दय़ांवरही परिसंवादात चर्चा होणार आहे.

दोन दिवसांच्या या परिसंवादाचे उद्घाटन २९ नोव्हेंबर रोजी ‘पेटीएम बँक’चे उपाध्यक्ष अभिषेक अरुण यांच्या हस्ते होणार असून ३० नोव्हेंबर रोजी समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. या परिसंदवादात ‘स्टार्टअप’ कसे सुरू केले याबाबत विविध ‘स्टार्टअप’चे संस्थापक संवाद साधणार आहेत. तर ‘स्टार्टअप’साठी निधी उभारणीचे आव्हान कसे पेलता येऊ शकेल याबाबत गुंतवणूकदार प्रकाश टाकणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:43 am

Web Title: loksatta badalta maharashtra 21
Next Stories
1 भिवंडी महापालिकेत पदोन्नती खिरापत घोटाळा
2 आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश
3 रोख वेतनासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Just Now!
X