‘बदलता महाराष्ट्र’च्या नव्या पर्वाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी या आणि संबंधित विषयांवर यंदा ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात विचारमंथन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या गुरुवारी, २१ आणि शुक्रवारी, २२ फेब्रुवारीला होईल. त्याचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल.

भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) १८ टक्के हिस्सा आणि उपलब्ध मनुष्यबळापैकी ५० टक्के रोजगार हे कृषी व आधारित क्षेत्राचे योगदान आहे. म्हणूनच या क्षेत्राला गांभीर्याने घेण्याची नितांत आवश्यकता आहे. भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही प्रगतिशील असतो; पण त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पीक विमा मिळवताना कोणत्या अडचणी येतात, गोदामांची स्थिती काय आहे, कृषी आणि उद्यमशीलतेची सांगड तो कशी घालतो, कृषीआधारित उद्योगांमध्ये कोणते प्रयोग सुरू आहेत, सेंद्रिय शेती खरोखरच फलदायी ठरते आहे का या आणि अशा विविध विषयांवर मंथनाची आवश्यकता आहे.

असे विचारमंथन ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात होणार आहे. वैचारिक, सकारात्मक आदान-प्रदानाची परंपरा कायम ठेवणाऱ्या ‘लोकसत्ता’चा यंदाचा ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम कृषी आणि कृषीआधारित उद्योग या विषयाला वाहिलेला आहे. कृषी क्षेत्राची सध्याची दशा आणि दिशा याचा वेध यानिमित्ताने घेतला जाईल.

या विषयांवर चर्चा

  • कृषी उद्योगाचे अर्थशास्त्र
  • कृषी संशोधन
  • फळ प्रक्रिया उद्योग
  • कृषी विमा
  • शेतमालाचे वायदे व्यवहार आणि बाजारपेठ
  • आधुनिक शेती

 

  • कार्यक्रम केव्हा- गुरुवार, २१ आणि शुक्रवार २२ फेब्रुवारी
  • उद्घाटन – चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री
  • सहप्रायोजक – एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर