‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात ‘कर्ती आणि करविती’ परिषद
समाजात विविध स्तरांवर बदल होत राहतात. हे बदल काही वेळा दृश्य स्वरूपातील असतात तर काही अदृश्य स्वरूपातील. समाजाचा अर्धा हिस्सा व्यापलेल्या स्त्रियांच्या जगण्यामध्ये होत असलेल्या या दृश्य-अदृश्य बदलांचा मागोवा ‘लोकसत्ता’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’च्या ‘कर्ती आणि करविती’ परिषदेत घेतला जाणार आहे. ९ आणि १० मार्च रोजी ही दोन दिवसांची परिषद पार पडेल.
समाज बदलण्याची गती सातत्याने वाढतेय आणि स्त्रियांच्या विकासाची गतीही त्याला अपवाद नाही. मात्र स्त्रियांच्या या बदलाकडे केवळ आधुनिकता या एकाच चष्म्यातून पाहणे योग्य नाही. सामाजिक, आर्थिक व राजकीय यशाच्या निकषांवर पुरेपूर उतरत स्त्रिया कर्त्यां भूमिकेत पोहोचल्या आहेत. ठरावीक उंची गाठल्यावर समानतेचा अनुभव येतो का, या उंचीवरून बाकीचे जग कसे दिसते, वेगळ्या वाटेवरचा आणि एकटीने हा प्रवास करतानाचे अनुभव काय होते, या प्रवासात चारित्र्याची अग्निपरीक्षा द्यावी लागली का असे अनेक प्रश्न या उंचीचे ध्येय मनात बाळगणाऱ्या तरुणींच्या व त्यांच्या आईवडिलांच्या मनातही रुंजी घालतात. या सर्व प्रश्नांची उकल बदलता महाराष्ट्रच्या महिला विशेष परिषदेत होईल.
स्त्रियांचे व त्यामुळे समाजाचे अवकाश व्यापलेल्या या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी प्रशासन, राजकारण, समाजकारण, संशोधन, साहित्य, शिक्षण, अभिनय, मॉडेलिंग, उद्योग अशा क्षेत्रांत अव्वल स्थान मिळवलेल्या स्त्रिया ‘बदलता महाराष्ट्र’च्या ‘कर्ती आणि करविती’मध्ये सहभागी होत आहेत. शिक्षण, उद्योग, अर्धनागरीकरण, सामाजिक चळवळी, शेती, पर्यावरण, पायाभूत सुविधा अशा विषयांचा सांगोपांग आढावा घेतल्यानंतर आता महिलांच्या भवितव्याबाबतचा आलेख ‘बदलता महाराष्ट्र’च्या पटलावर घेण्यात येत आहे. भूतकाळातील महिलांच्या समस्यांची दखल घेतानाच आजची स्थिती व उद्याची वाटचाल याबाबत चर्चा, मार्गदर्शन यावर परिषदेत भर दिला जाईल.