एक‘तिचा’लढा सत्रातील मान्यवरांची भावना
वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात ‘ती’च्या लढय़ाला घरच्यांचे, मित्रांचे, सहकाऱ्यांचे आणि समाजाचेही भरभक्कम पाठबळ मिळाले तर ते लढण्यासाठी प्रेरणा देते आणि मनोबल उंचाविते, असा सूर ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातील एक‘तिचा’लढा या सत्रात व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी संगवई-गोखले, सुपर मॉडेल आलिशिया राऊत, भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्यां नूरजहाँ निहाज या सहभागी झाल्या होत्या. शुभांगी संगवई-गोखले यांचे पती व अभिनेते मोहन गोखले यांच्या आकस्मिक निधनानंतर अर्थार्जन करण्याची आणि लहान मुलीचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.
मोहन गोखले यांची पत्नी म्हणून कोणाचीही सहानुभूती न मिळविता आणि पर्यायाने कोणाचेही मिंधेपण न घेता त्यांना एकटीच्या जबाबदारीवर पुढील संघर्ष करायचा होता. सुपर मॉडेल आलिशिया राऊत यांचा लग्नानंतर कौटुंबिक छळ होऊ लागला. पुढे मुलगा अवघ्या चार महिन्यांचा असताना त्यांनी नवऱ्याला सोडून पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मॉडेलिंगकडे वळून आपली घडी व्यवस्थित बसविली. मुस्लीम समाजातील तोंडी तलाक पद्धत आणि अन्य अनिष्ठ रूढी व परंपरांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस नूरजहाँ निहाज यांनी केले.
हा संघर्ष त्यांच्या मनोगतामधून उलगडला गेला. या सत्राचे सूत्रसंचालन अरुंधती जोशी यांनी केले.

मोहनच्या जाण्यानंतर माहेर आणि सासर दोन्हींकडून तसेच सहकाऱ्यांकडून पाठबळ मिळाले. माझ्या वडिलांचा मला भक्कम आधार आणि पाठिंबा मिळाला. त्यामुळे मी कुढत, रडत बसले नाही. माझ्या स्वाभिमानाला तडा जाऊ न देता मला एकटीला जगण्याचे बळ मिळाले.
– शुभांगी संगवई-गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री

मॉडेलिंगच्या क्षेत्रात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती आहेत. तुम्ही तुमचे संस्कार, तत्त्व आणि मूल्यांशी प्रामाणिक राहिलात तर तुम्ही वाहावत जात नाही. मॉडेलिंगच्या क्षेत्राने मला जगण्याची नवी हिंमत दिली. त्यामुळे भारतात परतल्यानंतर या क्षेत्रात काही तरी करावे असे ठरवले आणि रॅम्प वॉकचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
– आलिशिया राऊत, सुपर मॉडेल

मुस्लीम समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा कोणी नेता झाला नाही. मुस्लीम महिलांच्या आणि एकूणच मुस्लीम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाची स्थापना केली. आज संघटनेचे ७० हजारांहून अधिक सदस्य असून १३ राज्यांत संघटनेचे काम आहे.
-नूरजहाँ साफिया निहाज, भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्यां